शाळेखाली सापडली दुसऱ्या महायुद्धातील शस्त्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 10:21 IST2018-08-08T10:19:11+5:302018-08-08T10:21:16+5:30
१९४५ मध्ये युद्ध संपल्यावर ही शस्त्रे पूरण्यात आली असावी. जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धातील स्फोटके, बाँम्ब्स अनेकदा सापडले आहेत.

शाळेखाली सापडली दुसऱ्या महायुद्धातील शस्त्रे
टोकियो- दुसरे महायुद्ध संपून आता सात दशके लोटली असली तरी त्याबद्दलच्या कथा प्रत्येकवर्षी प्रसिद्ध होत असतात. या युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांबद्दल तसेच त्यांच्या वस्तूंबद्दलही नवे तपशिल समोर येत असतात. जपानमध्ये या युद्धात वापरलेल्या शस्त्रांचा साठा नुकताच सापडला आहे. हा साठा एका शाळेच्या खाली सापडला आहे. तनेशी एलिमेंटरी स्कूल असे या शाळेचे नाव आहे.
निशीटोकियोतील एका शाळेच्याखाली १४०० बंदुका आणि १२०० तलवारींचा साठा असल्याचे उत्खननात लक्षात आले. ही शस्त्रे जपानच्या इम्पिरियल आर्मीची असावीत असा अंदाज वर्तवला गेला आहे. या शस्त्रांप्रमाणेच बंदुकीच्या गोळ्या आणि तोफगोळेही जमिनीखाली दोन मीटर अंतरावर पुरली गेल्याचे दिसून आले.
१९४५ मध्ये युद्ध संपल्यावर ही शस्त्रे पूरण्यात आली असावी. जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धातील स्फोटके, बाँम्ब्स अनेकदा सापडले आहेत. अमेरिकेने फुकुशिमा येथे टाकलेला बाँम्ब गेल्या वर्षी सापडल्यानंतर निकामी करण्यात आला. जपानसह अनेक देशांमध्ये अशाप्रकारचे बाँम्बगोळे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही सापडतात. मात्र अशाप्रकारे तलवार व बंदुकांचा मोठा साठा सापडण्याची ही पहिलीच घटना असावी असे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे. साठा सापडल्यानंतर बंदुकीच्या गोळ्याव तोफगोळे ताब्यात घेण्यात आले आहेत.