विज्ञानकथा आता झाली खरी, पहिल्यांदाच आकाशात झाली ‘फॉर्म्युला वन’ची शर्यत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 08:19 IST2025-10-20T08:18:46+5:302025-10-20T08:19:36+5:30
रेसदरम्यान चार पायलटनी हवेतच बनवलेल्या ट्रॅकवर एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला.

विज्ञानकथा आता झाली खरी, पहिल्यांदाच आकाशात झाली ‘फॉर्म्युला वन’ची शर्यत!
टेक्सास : विज्ञान कथांमधूनच पाहायला मिळणारे दृश्य प्रत्यक्षात उतरले आहे. अमेरिकेतील टेक्सास राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जेस्टन एअर गेम्समध्ये प्रथमच उडणाऱ्या कारची शर्यत घेण्यात आली. ‘आकाशातील फॉर्म्युला वन’ म्हणून ओळखल्या गेलेल्या या रेसमध्ये जेस्टन वन नावाच्या वैयक्तिक इलेक्ट्रिक एअरक्राफ्टचा वापर करण्यात आला.
रेसदरम्यान चार पायलटनी हवेतच बनवलेल्या ट्रॅकवर एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला. ही शर्यत भविष्यातील अशा स्पर्धांचा आराखडा दाखवण्यासाठी आयोजित केल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीचे सहसंस्थापक तोमाज पाटन यांनी रेसमध्ये भाग घेतला.
रेससाठीच्या उडत्या कारची ही आहेत वैशिष्ट्ये...
सुमारे ११५ किलो वजनाची ही एक आसनी उडती कार १०२ किमी प्रतितास वेगाने ३२ किमी अंतर पार करू शकते. आठ शक्तिशाली रोटर्सच्या साहाय्याने ती उड्डाण करते. तिचा सांगाडा कार्बन फायबर व ॲल्युमिनियमचा बनलेला आहे. जवळपास २० मिनिटे अखंड उड्डाण करण्याची तिची क्षमता असून, ती १५०० फूट उंचीपर्यंत झेपावू शकते.
५५० ऑर्डरची नोंद
सुरक्षेच्या दृष्टीने या उडत्या कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आपत्कालीन प्रसंगी आपोआप लँड होऊ शकते. धोक्याच्या क्षणी तत्काळ उघडणारा बॅलिस्टिक पॅराशूट यामध्ये बसवलेले आहे.
सध्या या वाहनाची किंमत सुमारे ९५ लाख रुपये असून, अमेरिकेत हे उडविण्यासाठी पायलट परवान्याची आवश्यकता नाही.
लॉन्चनंतर सर्व प्रारंभिक मॉडेल्स त्वरित विकले गेले असून, २०२८ साठी नव्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५५० ऑर्डर्स नोंदवण्यात आल्या आहेत.