निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:13 IST2025-09-03T16:53:38+5:302025-09-03T17:13:38+5:30
अख्खा युरोप, अमेरिकाही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आला आहे. तरीही भारत त्यांना खुपत आहे. सौदीच्या या कंपन्यांवर थेट सौदीच्या राजघराण्याचे नियंत्रण आहे.

निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
रशियाकडून तेलखरेदी करत असल्या कारणाने अमेरिकेनंतर आता युरोपिय युनियनने भारतावर निर्बंध घातले आहेत. परंतू, त्यावरून काहीही संबंध नसणाऱ्या सौदीने भारतासोबत दगाफटका करण्यास सुरुवात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक कंपनीने भारतीय कंपनी नायराला कच्च्या तेलाचा पुरवठा करणे बंद केले आहे.
युरोपियन युनियनने रिफायनरीवर लादलेल्या निर्बंधांनुसार सौदी अरामको आणि इराकच्या स्टेट ऑर्गनायझेशन फॉर द मार्केटिंग ऑफ ऑइल (SOMO) ने भारताच्या नायरा एनर्जीला कच्चे तेल विकणे थांबवले आहे. अख्खा युरोप, अमेरिकाही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आला आहे. तरीही भारत त्यांना खुपत आहे. सौदीच्या या कंपन्यांवर थेट सौदीच्या राजघराण्याचे नियंत्रण आहे. सौदीचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हेच या कंपन्यांचा व्यापार पाहत असतात. परंतू, सध्या या कंपनीने भारताच्या एका कंपनीचा पुरवठा थांबविला आहे.
यामुळे नायराला रशियाकडून कच्चे तेल खरेदी वाढवावी लागणार आहे. युरोपियन युनियनच्या निर्बंधांमुळे पेमेंटच्या अनेक गुंतागुंत निर्माण झाल्या आहेत. इराकनेही नायराचा पुरवठा थांबविला आहे. वडिनार येथील नायराची ४,००,००० बॅरल/दिवस रिफायनरी आता ७०-८०% क्षमतेने चालू आहे. नायराला रोसनेफ्टकडून थेट पुरवठा होत आहे. नायरा एनर्जी ही देशाच्या एकून रिफायनरिच्या क्षमतेपैकी ८ टक्के उत्पादन करते. या कंपनीचे आता तालुका पातळीवरही पेट्रोल पंप आहेत. सौदी आणि इराकने कच्चे तेल थांबविल्याने आता या कंपनीला रशियावरच अवलंबून रहावे लागत आहे.