सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 10:38 IST2025-10-31T10:37:21+5:302025-10-31T10:38:59+5:30
उमराहबद्दल सौदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारतातील लाखो मुस्लिमांवर देखील याचा परिणाम होणार आहे.

सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
हज आणि उमराह यात्रेसाठी भारतातून मोठ्या संख्येने लोक सौदी अरेबियाला जातात. हज यात्रा ही एका विशिष्ट वेळेत होत असली तरी, उमराहसाठी वर्षभर लोक सौदीला प्रवास करत असतात. मात्र, आता उमराहबद्दल सौदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारतातील लाखो मुस्लिमांवर देखील याचा परिणाम होणार आहे. सौदी अरेबियाने उमराह प्रवेश व्हिसाची वैधता आता तीन महिन्यांवरून एका महिन्यावर आणली आहे.
आता, उमराह व्हिसा जारी केल्याच्या तारखेपासून फक्त एक महिना वैध असेल. जर, तुम्ही व्हिसा जारी झाल्यापासून एका महिन्याच्या आत उमरा केला नाही, तर तुमचा व्हिसा वैध राहणार नाही. अल-अरेबियाने हज आणि उमरा मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देत म्हटले की, प्रवेश व्हिसाचा कालावधी एक महिन्यापर्यंत कमी करण्यात आला आहे, परंतु सौदी अरेबियात आल्यानंतर यात्रेकरूंचा मुक्काम पूर्वीसारखाच, तीन महिन्यांचा राहील.
नवीन नियम कधी लागू होतील?
मंत्रालयाने उमराह व्हिसा नियमांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. सुधारित नियमांनुसार, जर एखाद्या यात्रेकरूने व्हिसा जारी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत सौदी अरेबियात प्रवेशासाठी नोंदणी केली नाही तर हा व्हिसा रद्द केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन नियम पुढील आठवड्यात लागू होतील.
हा निर्णय का घेण्यात आला?
उमराह राष्ट्रीय समितीचे सल्लागार अहमद बझैफर म्हणाले की, हा निर्णय उमराह यात्रेकरूंच्या संख्येत अपेक्षित वाढ होण्यासाठी मंत्रालयाच्या तयारीचा एक भाग आहे. विशेषतः उन्हाळा संपत असताना आणि मक्का आणि मदीनामधील तापमान थंड होत असताना, या दोन शहरांमध्ये गर्दी होते. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरेल.
जूनच्या सुरुवातीला नवीन उमराह हंगाम सुरू झाल्यापासून, परदेशी यात्रेकरूंना जारी केलेल्या उमराह व्हिसाची संख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. यावर्षीचा उमराह हंगाम केवळ पाच महिन्यांत परदेशी यात्रेकरूंच्या संख्येचा विक्रम प्रस्थापित करत आहे.
किती भारतीय उमराहला जातात?
सौदी अरेबियाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०२३ मध्ये, भारतीयांनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उमराह यात्रा केली. एकूण १८ लाख भारतीय मुस्लिमांनी उमराह यात्रा केली. उमराह ही मक्का येथील इस्लामिक तीर्थयात्रा आहे आणि वर्षाच्या कोणत्याही वेळी केली जाऊ शकते.