सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 09:14 IST2025-11-17T09:14:00+5:302025-11-17T09:14:33+5:30
Saudi Arab Prince America Visit: "ही केवळ भेट नव्हे तर क्राउन प्रिन्सचा सन्मानही होणार," असे ट्रम्प म्हणाले

सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
Saudi Arab Prince America Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची सध्या पाकिस्तानशी (Pakistan) उघडपणे जवळीक वाढताना दिसत आहेत. तशातच आता तब्बल ७ वर्षानंतर सौदी अरबचे क्राउन प्रिन्स (Crowned Prince) मोहम्मद बिन सलमान अमेरिका (Mohammed bin Salman Al Saud) दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे ट्रम्प प्रचंड आनंदी असल्याचे म्हटले जात आहे. ट्रम्प यांनी प्रिन्सच्या अमेरिका भेटीदरम्यान क्राउन प्रिन्सचे भव्य स्वागत करण्याची योजना आखली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सकाळी प्रिन्सचा स्वागत समारंभ आणि संध्याकाळी औपचारिक डिनर पार्टी होणार आहे. "आम्ही फक्त भेटणार नाही आहोत तर अमेरिका सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्सचा सन्मान करणार आहे," असे ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथे सांगितले. ट्रम्प आणि क्राउन प्रिन्स मंगळवारी भेटतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प इतके आनंदी का?
ट्रम्प यांना सौदीशी सौहार्दाचे संबंध निर्माण करायचे आहेत. त्यासाठी त्यांनी खूप कामही केले आहे. त्यांना आशा आहे की सौदीदेखील इस्रायलशी राजकीय संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेईल. ट्रम्प यांना आशा आहे की क्राउन प्रिन्स हे अब्राहम करारावर स्वाक्षरी करतील आणि तो करार पुढे सुरू ठेवण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जाईल. परंतु आतापर्यंत सौदीकडून याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. "अब्राहम करार आमच्या वाटाघाटींचा भाग असेल आणि मला आशा आहे की सौदी अरेबिया लवकरच अब्राहम करारात सामील होईल," असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना आशा व्यक्त केली.
७ वर्षांपूर्वी झाला होता दौरा
तुर्कीमधील सौदी वाणिज्य दूतावासात बंडखोर पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येच्या काही महिन्यांपूर्वी, २०१८ मध्ये क्राउन प्रिन्स शेवटचे अमेरिका दौऱ्यावर आले होते. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सीआयएच्या मूल्यांकनात असे म्हटले आहे की ही हत्या प्रिन्सच्या आदेशानुसार करण्यात आली होती. पण त्यांनी नेहमीच यातील सहभाग नाकारला होता. आगामी भेटीमुळे, अमेरिका-सौदी संबंधांमधील दुरावा कमी होण्याची चिन्हे आहेत. लष्करी बँडसह स्वागत समारंभ, ओव्हल ऑफिसमध्ये द्विपक्षीय बैठक आणि संध्याकाळी ब्लॅक-टाय डिनर असा क्राउन प्रिन्ससाठीचा थाटमाट असणार आहे.
व्हाईट हाऊसकडून 'मेसेज'
"राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करण्यास उत्सुक आहेत, जिथे दोन्ही नेते अधिकृत कामकाजाच्या बैठकीत सहभागी होतील. सध्या सुरू असलेल्या चर्चेवर आम्ही आताच भाष्य करणार नाही," असे व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सीएनएनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.