डोनाल्ड ट्रम्प भारताचे मित्र की शत्रू? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर स्पष्टच बोलले..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:24 IST2025-01-30T20:23:43+5:302025-01-30T20:24:16+5:30
S Jaishankar on Donald Trump : 'ट्रम्प अनेक गोष्टी बदलतील, काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे नसतील, अनेक मुद्द्यांवर आमचे एकमत नसेल...'

डोनाल्ड ट्रम्प भारताचे मित्र की शत्रू? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर स्पष्टच बोलले..!
S Jaishankar on Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर भारत-चीनसह अनेक देशांवर कर लादण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय, त्यांनी स्थलांतरीतांबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम भारतावर पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ट्रम्पमुळे भारताचा फायदा होईल की, अडचणी वाढतील? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावर आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर महत्वाची माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे मित्र की शत्रू ?
जयशंकर यांनी गुरुवारी (30 जानेवारी 2025) भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन राष्ट्रवादी असे वर्णन केले. दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) हंसराज कॉलेजमध्ये एका संवादात्मक सत्रात, एस. जयशंकर यांनी जागतिक मुत्सद्देगिरीचे विकसित होत जाणारे स्वरूप आणि त्याकडे भारताचा दृष्टिकोन अधोरेखित केला.
डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे मित्र की शत्रू? या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले, मी नुकताच त्यांच्या (ट्रम्प) शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलो. त्यांच्याकडून मला अतिशय चांगली वागणूक मिळाली. त्यांच्या धोरणांमुळे जागतिक घडामोडींमध्ये लक्षणीय बदल घडू शकतात, हे मी मान्य करतो, परंतु भारताचे परराष्ट्र धोरणदेखील राष्ट्रीय हिताचे आहे, असे जयशंकर यावेळी स्पष्टपणे म्हणाले.
होय, ट्रम्प अनेक गोष्टी बदलतील, काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे नसतील, पण देशाच्या हिताच्या दृष्टीने परराष्ट्र धोरणांच्या बाबतीत आपल्याला खुले असले पाहिजे. असे काही मुद्दे असू शकतात, ज्यावर आमचे एकमत नसेल, पण अशी अनेक क्षेत्रे असतील, जिथे गोष्टी आमच्या कार्यक्षेत्रात असतील. आपले अमेरिकेसोबतचे संबंध मजबूत आहेत आणि पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांच्याशी चांगले वैयक्तिक संबंध आहेत, अशी महत्वाची प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.