S Jaishankar Meets Xi Jinping:भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीदरम्यान त्यांनी बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा संदेश दिला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर या बैठकीची माहिती शेअर करताना परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, "आज सकाळी बीजिंगमध्ये चीनी परराष्ट्र मंत्र्यांसह शी जिनपिंग यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांना शुभेच्छा दिल्या. आमच्या द्विपक्षीय संबंधांमधील अलिकडच्या घडामोडींबद्दल अध्यक्ष शी जिनपिंग यांना माहिती दिली," असे जयशंकर म्हणाले.
बैठकीत भारत-चीन संबंधांवर चर्चाजयशंकर आणि शी जिनपिंग यांनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमधील अलिकडच्या प्रगती, परस्पर सहकार्य आणि प्रादेशिक स्थिरता यासारख्या विषयांवर चर्चा केली. परराष्ट्र मंत्र्यांनी हे देखील स्पष्ट केले की, भारत नेतृत्व स्तरावर संवाद खूप महत्त्वाचा मानतो आणि त्या दिशेने पुढे जात आहे.
बैठक का महत्त्वाची?गेल्या काही वर्षांपासून सीमा वाद आणि व्यापार तणाव असूनही भारत आणि चीनमध्ये संवाद सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाताहेत. बीजिंगमधील ही बैठक अशा वेळी झाली आहे, जेव्हा SCO सारख्या बहुपक्षीय व्यासपीठावर दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये संवाद हा एक सकारात्मक संकेत मानला जातो.
SCO शिखर परिषद म्हणजे काय?SCO (शांघाय सहकार्य संघटना) ही एक राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा संघटना आहे, ज्यामध्ये 9 सदस्य देश (चीन, रशिया, भारत, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि इराण) आणि अनेक निरीक्षक आणि संवाद भागीदार देश आहेत.