आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:59 IST2025-10-24T17:59:02+5:302025-10-24T17:59:46+5:30
russia nuclear fighter jet tu95ms news: रशियाची फायटर जेट्स आशियाई हवाई हद्दीत दिसल्याने उडाली खळबळ

आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
russia nuclear fighter jet tu95ms news: गेल्या काही महिन्यांपासून आशिया खंडातील विविध देशांमध्ये अंतर्गत आणि परकीय आक्रमणे सुरू आहेत. काही देशांमध्ये सत्तापालटही झाला आहे. तशातच शुक्रवारी आशियाई उपखंडाच्या हवाई हद्दीत अचानत रशियन आण्विक लढाऊ-बॉम्बर विमान म्हणजे फायटर जेट उडताना दिसल्याने खळबळ उडाली. रशिया आणि युक्रेन यांच्यात बराच युद्धजन्य परिस्थिती आहे. पण त्यांचे फायटर जेट आशियाई हवाई हद्दीत कुठून आले, त्याचा नेमका हेतु काय यावरून चर्चा रंगली. त्यावर रशियन संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले.
रशियन संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे काय?
रशियाच्या अधिकृत स्टेट वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, रशियन संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली की Tu-95MS हे स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमान आशियाई हवाई हद्दीत उडताना दिसल्याचे बाब खरी आहे. हे लढाऊ विमान जपानी समुद्रावरील आंतरराष्ट्रीय हवाई व जलक्षेत्रात गस्त घालत होते. पण ते एक नियमित गस्त उड्डाण म्हणजेच 'रूटीन पेट्रोलिंग' होते. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, हे उड्डाण रशियाच्या लांब पल्ल्याच्या विमानांची तयारी तपासण्यासाठी आणि चाचपणी करण्यासाठी 'रूटीन पेट्रोलिंग' मोहिमेचा भाग होते.
परदेशी देशांची विमानेही दिसली सोबत
रशियाने आपले Tu-95MS हे स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमान आशियाई हवाई हद्दीत उडवले होते. त्या उड्डाणादरम्यान काही परदेशी देशांचे लढाऊ विमानदेखील रशियन बॉम्बर विमानासोबत उड्डाण करत असल्याचे दिसून आले. मंत्रालयाने त्यावरही स्पष्टीकरण दिले आहे की, परदेशी विमानांनी विविध टप्प्यांवर रशियन बॉम्बर्सना एस्कॉर्ट केले होते, त्यामुळे ते सोबत उड्डाण करत होते. परंतु कोणताही संघर्ष किंवा तणाव निर्माण झाला नाही.
Tu-95MS फायटर जेटची वैशिष्ट्ये काय?
Tu-95MS या फायटर जेट्सना बेअर म्हणूनही ओळखले जाते. हे रशियाच्या सर्वात जुन्या परंतु सर्वात शक्तिशाली स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सपैकी एक जेट आहे. अण्वस्त्रे आणि लांब पल्ल्याच्या क्षमतेसह ते रशियापासून थेट आशिया-पॅसिफिक प्रदेशाच्या कोणत्याही भागात उड्डाण करू शकते.
रूटीन पेट्रोलिंग की धोरणात्मक संदेश?
रशियाने याचे वर्णन "रूटीन पेट्रोलिंग" असे केले असले तरी, आंतरराष्ट्रीय विश्लेषक याकडे एक सूचक धोरणात्मक संदेश म्हणून पाहत आहेत. युक्रेन युद्ध आणि आशियातील बदलत्या भू-राजकीय गतिशीलतेदरम्यान, हे उड्डाण पाश्चात्य देश आणि जपानसाठी एक इशारा म्हणून पाहिले जात आहे. रशिया यातून केवळ युरोपमध्येच नव्हे तर आशिया खंडातही आपली लष्करी उपस्थिती दाखवू इच्छित असल्याचे जाणकारांचे मत आहे.