Russia vs Ukraine War: ...तेव्हाच रशिया-युक्रेन युद्ध थांबेल! अखेर पुतीन बोलले, आपले इरादे स्पष्टपणे सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 23:35 IST2022-02-25T23:32:47+5:302022-02-25T23:35:21+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये पुढे काय घडणार?; रशियाच्या अध्यक्षांनी दिले महत्त्वाचे संकेत

Russia vs Ukraine War: ...तेव्हाच रशिया-युक्रेन युद्ध थांबेल! अखेर पुतीन बोलले, आपले इरादे स्पष्टपणे सांगितले
मॉस्को: युक्रेनवर आक्रमण करून युद्ध छेडणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी आता त्यांची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. युक्रेनमधील सरकार उलथवून टाकण्याचा पुतीन यांचा प्रयत्न आहे. युक्रेन लष्करानं सध्याच्या नेतृत्त्वाला बाजूला सारून देशाची सत्ता हाती घ्यावी, असं पुतीन यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या सैन्यानं देशाची सुत्रे आपल्याकडे घ्यावीत. तेव्हाच दोन देशांमधलं युद्ध थांबेल, असं पुतीन म्हणाले.
देशाच्या नेतृत्त्वाला बाजूला सारून सुत्रं ताब्यात घ्या, असं आवाहन पुतीन यांनी केलं. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार दहशतवादी आणि नवनाझींचा एक गट झाल्याची टीका पुतीन यांनी केली. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये शिरण्याच्या तयारीत असताना पुतीन यांनी हे विधान केलं.
नवनाझींच्या तुलनेत तुमच्याशी सहमत होणं आम्हाला अधिक सोपं जाईल, असं पुतीन पुढे म्हणाले. युक्रेन सरकार नाझी दहशतवाद्यांप्रमाणे वागत आहे. नागरिकांची ढाल करून त्यांचं काम सुरू आहे. सरकार देशातील लहान मुलांचा, वृद्धांचा ढाल म्हणून वापर करत आहे. त्यांनी हे बंद करावं, असं पुतीन यांनी म्हटलं. आम्ही युक्रेनवर कब्जा करण्यासाठी आलेलो नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, अशी ग्वाही पुतीन यांनी दिली आहे.