Russia vs Ukraine War: युक्रेनचा पुतीन यांना जबर दणका! रशियन सैन्याच्या तुकडीवर मोठा हल्ला; रणगाडे, तोफा, वाहनं उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 19:03 IST2022-03-01T19:03:22+5:302022-03-01T19:03:54+5:30
Russia vs Ukraine War: कीवबाहेर दोन देशांच्या सैन्यांमध्ये संघर्ष; अनेक आघाड्यांवर रशियानं सपाटून मार खाल्ला

Russia vs Ukraine War: युक्रेनचा पुतीन यांना जबर दणका! रशियन सैन्याच्या तुकडीवर मोठा हल्ला; रणगाडे, तोफा, वाहनं उद्ध्वस्त
मॉस्को: युक्रेनविरुद्ध युद्ध जाहीर केल्यानंतर दोन दिवसांत विजय नक्की अशी खात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना होती. मात्र युक्रेननं अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या नेतृत्त्वाखाली चांगला प्रतिकार केला. युद्धाचा सहावा दिवस उजाडला असला तरीही रशियन सैन्याला युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेता आलेली नाही. कीववर हल्ले करणाऱ्या रशियावर युक्रेनच्या सैन्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला.
राजधानी कीव ताब्यात घेण्याचे रशियाचे प्रयत्न युक्रेनच्या फौजा हाणून पाडताना दिसत आहेत. युक्रेनच्या सैन्यानं रशियन सैन्याला जोरदार दणका दिला आहे. पाश्चिमात्य देशांकडून मिळालेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांच्या मदतीनं युक्रेनी सैन्यानं रशियन लष्कराचं मोठं नुकसान केलं आहे. युक्रेनमधल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी रशियाचे रणगाडे, तोफ, शस्त्रसज्ज वाहनं उद्ध्वस्त झालेल्या स्थितीत दिसत आहेत. मात्र यानंतरही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सैन्याला माघारी बोलावण्यास तयार नाहीत.
सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार, कीवच्या बाहेर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये जोरदार संघर्ष झाला. युक्रेनी सैन्यानं अनेक आघाड्यांवर रशियाला दणका दिला. त्यामुळे रशियन सैन्याला अनेक ठिकाणी माघार घ्यावी लागली. रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर करत युक्रेनी सैन्यानं रशियन लष्कराची अनेक वाहनं उद्ध्वस्त केली. ही वाहनं कीवच्या बाहेरील रस्त्यांवर दिसत आहेत. त्यांच्या आसपास रशियन सैनिकांचे मृतदेह पडलेले आहेत.
रशियन सैन्याच्या रणगाड्यांवर व्ही चिन्ह आहे. त्याचा अर्थ वोस्तोव असा होतो. रशियन सैन्याच्या पूर्व कमांडच्या अंतर्गत येणाऱ्या वाहनांवर व्ही चिन्ह असतं. त्यामुळे उद्ध्वस्त झालेले रणगाडे, तोफा, वाहनं रशियाच्याच असल्याचं स्पष्ट होत आहे. रशियन सैन्य दोन दिवसांत किव ताब्यात घेईल, असा पुतीन यांना विश्वास होता. मात्र तो सपशेल फसलेला आहे.