१५ ऑगस्टला अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेन युद्धाबाबत चर्चा झाली. ज्या ठिकाणी ही भेट झाली, तो भाग अमेरिकेच्या ताब्यात आहे. त्यामुळे व्लादीमीर पुतिन स्वत: अलास्काला जाण्याऐवजी त्यांच्या डुप्लिकेटला ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यास पाठवल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियात सध्या या तर्क वितर्कांना उधाण आले आहे. पुतिन यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शारीरिक हालचाली यावरून अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. एक्सवर काही युजर्सने लिहिलंय की, अलास्का येथे जी व्यक्ती ट्रम्प यांना भेटली, त्याचे गाल जास्त फुगलेले दिसत होते, त्याशिवाय गरजेहून अधिक ही व्यक्ती चेहरा हसरा ठेवत होती असं म्हटले. तर दुसऱ्याने हे खरे पुतिन नव्हते, ट्रम्प यांच्या भेटीला योग्य डुप्लिकेटही पाठवला नाही. हे जॉवियल पुतिन आहेत, ज्यांना छोट्या पब्लिक मिटिंगसाठी वापरले जाते असा दावा एका युजरने केला.
काय आहे बॉडी डबल नंबर ५?
काही लोकांनी हीच थेअरी पुढे करत दावा केला की, हा पुतिनचा बॉडी डबल नंबर ५ असू शकतो, या व्यक्तीच्या चालण्यात पुतिन यांच्यासारखा रुबाबदारपणा नव्हता. पुतिनसारखा हा व्यक्ती त्याचा उजवा हात स्थिर ठेवून चालत नव्हता, जसं पुतिन चालतात. ही शैली प्रत्यक्षात त्याच्या केजीबी प्रशिक्षणाशी संबंधित असल्याचे मानले जाते. सोव्हिएत सुरक्षा एजन्सीमध्ये एजंटना शस्त्र बाळगणारा हात नेहमी जवळ आणि स्थिर ठेवण्यास शिकवले जात असे जेणेकरून गरज पडल्यास बंदूक ताबडतोब बाहेर काढता येईल.
विशेष म्हणजे, पुतिन बऱ्याचदा त्यांच्या बॉडी डबलचा वापर करतात हे नवीन नाही. याआधी अनेकदा रशियन राष्ट्रपतींच्या जवळच्या लोकांनी पुतिन यांच्याकडे अनेक बॉडी डबल्स आहेत असा आरोप केला आहे. या विषयावर "व्लादिमीर पुतिन यांचे बॉडी डबल्स" शीर्षक असलेला एक संपूर्ण लेख विकिपीडियावर आहे. पुतिन यांच्यासारखे दिसण्यासाठी बॉडी डबल्सकडून अनेक शस्त्रक्रिया करून घेतल्या जातात. यापैकी काही लोक खऱ्या आणि खोट्या पुतिनमधील फरक ओळखण्यासाठी त्यांच्या चालण्याकडे आणि दिसण्याकडे लक्ष वेधतात.