Russia Ukraine War: भारतीय विद्यार्थी खारकीवमध्ये का अडकले? युक्रेनमध्ये भयावह परिस्थिती, रशियाने सर्वांनाच अडचणीत आणले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 17:37 IST2022-03-01T17:32:01+5:302022-03-01T17:37:47+5:30
Russia Ukraine War Kharkiv Situation: अधिकतर विद्यार्थी हे तेथील हॉटेल, मेस आदीवर अवलंबून होते. यामुळे आता त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी काहीच उरलेले नाहीय. भारतासोबत पाकिस्तान, चीनचे विद्यार्थीदेखील अडकले आहेत.

Russia Ukraine War: भारतीय विद्यार्थी खारकीवमध्ये का अडकले? युक्रेनमध्ये भयावह परिस्थिती, रशियाने सर्वांनाच अडचणीत आणले
खारकीवमध्ये रशियन सैन्याच्या हल्ल्य़ात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. आताही ३ हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी या शहरात अडकले आहेत. खारकीव हे युक्रेनमधील दुसरे मोठे शहर आहे. सुरुवातीला रशियन सैन्याने या शहरावर ताबा मिळविला होता. परंतू, युक्रेनच्या सैन्याने त्यांना पुन्हा शहराबाहेर काढले आहे. यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
अधिकतर विद्यार्थी हे तेथील हॉटेल, मेस आदीवर अवलंबून होते. यामुळे आता त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी काहीच उरलेले नाहीय. भारतासोबत पाकिस्तान, चीनचे विद्यार्थीदेखील अडकले आहेत. खारकीवच्या छोट्या छोट्या रस्त्यावर देखील युद्ध लढले जात आहे. अशावेळी खारकीवच्या प्रशासनाने या विद्यार्थ्यांना मदत करू शकत नसल्याचे सांगत हात वर केले आहेत.
दुसरीकडे खारकीवची भौगेलिक रचना कारणीभूत आहे. रशियाच्या सीमेवर वसलेले हे शहर आहे म्हणजे अगदी जवळ. शिवाय रशियाचा सर्वाधिक मोठा लष्करी तळ बेलगोरोद अत्यंत जवळ आहे. यामुळे खारकीवला वेढा घालण्यात आला आहे. यामुळे जर या विद्यार्थ्यांना बाहेर पडायचे असेल त्यांना युक्रेनच्या दिशेने जाऊन रोमानिया, हंगेरी, स्लोवाकिया किंवा पोलंडला जावे लागणार आहे. जे सध्यातरी एकेका विद्यार्थ्याला शक्य नाही. कारण युक्रेनच्या नागरिकांनी पलायन सुरु केल्याने या देशांच्या सीमांवर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत.
गेल्या महिनाभरापासून भारतीय दूतावास येथील विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्यास सांगत आहे. मात्र, विमानांची संख्या त्या प्रमाणावर नसल्याने तसेच तिकीटे वाढल्याने हे विद्यार्थी जाऊ शकले नाहीत. आता तर खूपच बिकट परिस्थिती ओढवली आहे. एका विद्यार्थ्य़ाचा मृत्यू झाल्याने या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काहीही करा आम्हाला इथून बाहेर काढा असे हे विद्यार्थी आपल्या पालकांना सांगत आहेत.