पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 20:42 IST2025-10-20T20:41:33+5:302025-10-20T20:42:08+5:30
Russia Ukraine War Updates: डोनाल्ड ट्रम्प सातत्याने युक्रेन-रशिया संघर्ष शमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत

पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेले युद्ध अजूनही पूर्णपणे थांबलेले नाही. दोन्ही देश हार मानायला तयार नाहीत. यादरम्यान, काही देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने युक्रेन आणि रशिया यांच्यात शांतता करार घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तशातच हंगेरी येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ट्रम्प यांच्याशी भेट होणार आहे. याबाबत जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सूचक विधान केले. जर मला बैठकीचे निमंत्रण मिळाले, तर मीदेखील पुतिन आणि ट्रम्प यांच्यासोबत शिखर परिषदेला उपस्थित राहण्यास तयार आहेत.
बैठकीला उपस्थित राहण्याबद्दल...
अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी गेल्या गुरुवारी घोषणा केली की, ते येत्या काही दिवसांत बुडापेस्टमध्ये युक्रेन युद्धावर चर्चा करण्याची योजना आखत आहेत. ट्रम्प यांनी घोषणा केली होती की ते युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या उद्देशाने दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी बुडापेस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतील. बुडापेस्टमध्ये पुतिन यांच्यासोबत होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेबाबत झेलेन्स्की म्हणाले की, ते या बैठकीला उपस्थित राहण्यासही तयार आहेत. ट्रम्प आणि पुतिन यांनी पुढील काही आठवड्यात हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे भेटण्याची योजना जाहीर केल्यानंतर झेलेन्स्की यांचे हे विधान आले आहे. रशियाच्या २०२२च्या आक्रमणापासून सुरू झालेल्या साडेतीन वर्षांच्या युद्धाचा अंत करण्यासाठी शांतता करार करण्यासाठी वॉशिंग्टनच्या नव्याने सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. ट्रम्प रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या संघर्षाचा अंत करण्यावर भर देत आहेत.
झेलेन्स्की काय म्हणाले?
पत्रकारांशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले, "जर मला बुडापेस्टला आमंत्रित केले गेले, जर आमंत्रण अशा स्वरूपात असेल जिथे आम्ही तिघे भेटणार असू किंवा शटल डिप्लोमसी प्रमाणे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुतिनला भेटणार आणि नंतर मलाही भेटणार असेल, तर मी या स्वरूपावर काहीसा सहमत होऊ शकेन." पण झेलेन्स्की यांनी हंगेरीच्या स्थळाच्या निवडीवर टीका केली. हंगेरीचे नेते व्हिक्टर ऑर्बन यांचा उल्लेख करत झेलेन्स्की म्हणाले, "युक्रेनला सर्वत्र रोखणारा पंतप्रधान युक्रेनियन लोकांसाठी काहीही सकारात्मक करू शकतो किंवा संतुलित योगदान देऊ शकतो असे मला वाटत नाही." दरम्यान, सत्तेत आल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी युक्रेनियन आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये अनेक वेळा थेट चर्चा घडवून आणली आहे परंतु त्यांच्या राजकीय प्रयत्नांना अद्याप कोणतेही महत्त्वपूर्ण यश मिळालेले नाही.