Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान वोलोडिमीर झेलेंस्कींना अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांचं 'स्पेशल गिफ्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 09:45 IST2022-03-08T09:44:30+5:302022-03-08T09:45:03+5:30
रशिया-यूक्रेन युद्धात अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन(Joe Biden) यांनी झेलेंस्की यांना स्पेशल गिफ्ट पाठवलं आहे. ज्यामुळे ते सातत्याने अमेरिकेच्या संपर्कात आहेत.

Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान वोलोडिमीर झेलेंस्कींना अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांचं 'स्पेशल गिफ्ट'
न्यूयॉर्क – गेल्या १३ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. अद्यापही बलाढ्य रशियाला यूक्रेन ताब्यात मिळवण्यात यश आलं नाही. रशियाच्या आक्रमक हल्ल्यात यूक्रेनची अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यातच यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमीर झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांच्या जीवाला धोका असल्याने ते एका गुप्त ठिकाणी सुरक्षित असून त्यांच्या बचावासाठी अमेरिकन नेवी सील आणि ब्रिटीश SAS कंमांडोज तैनात करण्यात आले आहेत.
रशिया-यूक्रेन युद्धात अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन(Joe Biden) यांनी झेलेंस्की यांना स्पेशल गिफ्ट पाठवलं आहे. ज्यामुळे ते सातत्याने अमेरिकेच्या संपर्कात आहेत. झेलेंस्की शॉर्ट नोटीसवरही थेट बायडन यांच्याशी संवाद साधू शकतात. न्यूयॉर्क टाइम्सनं सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, यूएसनं NATO आयटी एसेट लॅपटॉप झेलेंस्की यांना पाठवला आहे. ज्यामुळे यूक्रेनचा संपर्क नाटो देशांशी राहील. तसेच यूक्रेनी राष्ट्रपतींकडे मोबाईल एन्क्रिप्टेड उपकरण आहेत ज्यामुळे अमेरिकेसह इतर देश त्यांच्या संपर्कात आहेत.
झेलेंस्की या मोबाईलच्या सहाय्याने २४ बाय ७ कुठल्याही क्षणी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांच्याशी बोलू शकतात. झेलेंस्की यांनी शनिवारी बायडन यांच्यासोबत ३५ मिनिटांच्या संवादासाठी याच उपकरणाचा वापर केला. अमेरिका सातत्याने यूक्रेनला आर्थिक मदत आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. तर दुसरीकडे द सनने ब्रिटनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटलंय की, झेलेंस्की यांना कीव्हच्या बाहेर काढण्याचा पर्याय आहे. यूक्रेनला नो फ्लाई झोन घोषित करण्याचं आवाहन झेलेंस्कींनी अमेरिका आणि NATO देशांना केले आहे.
नाटो देशांनी यूक्रेनला नो फ्लाई झोन बनवण्यास नकार दिला आहे. जर यूक्रेनला नो फ्लाई झोन घोषित केले तर सर्व अनाधिकृत विमानांना यूक्रेनच्या वरून उड्डाण करण्यास बंदी असेल. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी सांगितले होते की, यूक्रेनवर कुठल्याही तिसऱ्या देशाने नो फ्लाई झोन बनवण्याची घोषणा केली तर त्याला युद्धातील भागीदार मानलं जाईल. त्यानंतर अमेरिकेसह नाटो देश मागे हटले आहेत. त्यामुळे झेलेंस्की यांनी नाटोच्या या निर्णयाचा विरोध केला.