रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या सव्वा तीन वर्षांपासून भीषण युद्ध सुरू आहे. तसेच अनेक घडामोडींनंतरही हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे, अशा परिस्थितीत आता या संघर्षाला थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. तसेच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी सोमवारी सकाळी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून बोलणार आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, पुतीन यांच्याशी बोलण्याचा हेतू हा हे भीषण युद्ध संपवणं हाच आहे. मी सर्वप्रथम व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी बोलणार आहे. तसेच त्यानंत नाटोच्या प्रतिनिधींशी चर्चा करून संभाव्य युद्धविरामाबाबत चर्चा करण्यात येईल. रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दर आठवड्याला हजारो रशियन आणि युक्रेनी सैनिक मारले जात आहेत. आता हे भीषण युद्ध थांबलं पाहिजे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सांगितले की, सोमवार हा एक महत्त्वपूर्ण दिवस असेल, अशी अपेक्षा आहे. एक युद्धविराम निश्चित होईल आणि सुरू होता कामा नये होतं असं हे भीषण युद्ध संपुष्टात येईल.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी या संघर्षाचा तोडगा हा लष्करी पद्धतीने काढता येणार नाही. त्यासाठी मुत्सद्देगिरी हाच एकमेव पर्याय आहे, असे सांगितले.