Russia Ukraine War: रशिया अन् युक्रेनमध्ये आज तिसऱ्यांदा झाली चर्चा; यावेळीही पहिल्या फेरीसारखंच घडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 10:18 IST2022-03-08T10:14:34+5:302022-03-08T10:18:55+5:30
आज रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये तिसऱ्यांदा चर्चा झाली.

Russia Ukraine War: रशिया अन् युक्रेनमध्ये आज तिसऱ्यांदा झाली चर्चा; यावेळीही पहिल्या फेरीसारखंच घडलं!
रशियाने नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सोमवारी सकाळपासून युद्धविरामासह अनेक भागात मानवतावादी कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केली. पण, कॉरिडॉरच्या घोषणेनंतरही, रशियन सैन्याने काही युक्रेनियन शहरांवर रॉकेट हल्ले आणि काही भागात भीषण लढाई सुरुच ठेवली. उत्तर, दक्षिण आणि मध्य युक्रेनमधील शहरांमध्ये रशियाने गोळीबार सुरू ठेवल्याने हजारो युक्रेनियन सुरक्षितपणे पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा आज १३वा दिवस आहे. एकीकडे दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु असताना दूसरीकडे दोन्ही देशांमध्ये चर्चा देखील सुरु आहे. आज रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये तिसऱ्यांदा चर्चा झाली. मात्र चर्चेची तिसरी फेरीही कोणत्याही महत्त्वपूर्ण निकालांशिवाय संपली. याआधी दोनवेळा दोन्ही देशांमधील अधिकारी चर्चेसाठी समोर आले होते. मात्र त्यावेळी देखील कोणताही तोडगा निघाला नव्हता.
Third round of Ukraine-Russia talks end with no significant results: Report
— ANI Digital (@ani_digital) March 7, 2022
Read @ANI Story | https://t.co/dePZjIv0Zw#Ukrainecrisispic.twitter.com/iw0qgBNLji
दरम्यान, युक्रेनवर हल्ला केल्याप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. त्याबाबत सोमवारी झालेल्या सुनावणीकडे रशियाने पाठ फिरविली. रशियाला ताबडतोब लढाई थांबविण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला केली आहे. युक्रेनचे प्रतिनिधी ॲन्टॉन कोरिनेविच यांनी न्यायाधीशांना सांगितले की, युक्रेनमध्ये हत्याकांडे घडविण्यात आल्याचा रशियाचा आरोप अतिशय चुकीचा आहे. युक्रेनला आपल्या टाचेखाली ठेवण्याची रशियाला इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी हे युद्ध आमच्यावर लादले आहे. युद्धासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालय लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आलेल्या युक्रेनबाबतच्या तोंडी सुनावणीत सहभागी होण्यास रशियाने नकार दिला आहे.
निर्वासितांची संख्या १७ लाखांच्या पुढे-
युद्धातील मृतांचा आकडा स्पष्ट झालेला नाही. खार्किव प्रदेश पोलिसांनी सोमवारी सांगितले की, तिथे २०९ लोकांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी १३३ सामान्य नागरिक होते. यूएन निर्वासित एजन्सी म्हणते की, युद्धग्रस्त युक्रेन सोडून आतापर्यंत १७ लाखांहून अधिक लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. इतर अनेक शहरांमध्ये गोळीबारात अडकले आहेत.
२०० ते ३०० डॉलर्स देणार-
रशियाकडून अशा प्रकारची भरती होत असल्याच्या बातम्या सिरियन माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. युद्धात सहभागी होणाऱ्यांना २०० ते ३०० डॉलर्स देण्याची रशियाची तयारी आहे. लिबियाविरोधातील युद्धामध्ये या लोकांनी शहरी युद्धातून प्रतिकार केला होता. त्यात रशियाने सिरियाला मदत केली आहे.