रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण! पुतिन यांचा चीनच्या जिनपिंगना फोन, काय झाली चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 20:17 IST2025-02-24T20:15:36+5:302025-02-24T20:17:02+5:30
Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्ष होत आली, पण युद्ध अद्याप थांबलेले नाही

रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण! पुतिन यांचा चीनच्या जिनपिंगना फोन, काय झाली चर्चा?
Russia Ukraine War : सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ( Vladimir Putin ) यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ( Xi Jinping ) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्ष होत आली, पण युद्ध अद्याप थांबलेले नाही. अशातच या दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. पुतिन यांनी जिनपिंग यांना रशिया आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचीही माहिती दिली. यासोबतच, रशिया आणि चीनमधील व्यापक भागीदारी आणि धोरणात्मक संबंध वाढवण्यावरही सखोल चर्चा झाली.
पुतिन - जिनपिंग यांच्यात चर्चा काय?
पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यातील दीर्घ दूरध्वनी संभाषणादरम्यान, युक्रेनबाबत रशिया आणि अमेरिकेत सुरू असलेल्या चर्चेची माहिती त्यांनी दिली. रशिया आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या चर्चेला चीनने पाठिंबा दर्शविला आहे. युक्रेनियन संघर्ष शांततेने सोडवण्याचे मार्ग शोधण्यात मदत करण्याची तयारी चीनने दर्शवली. याशिवाय, दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी अर्थव्यवस्था आणि व्यापार, गुंतवणूक, संस्कृती, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात फायदेशीर सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. पुतिन आणि जिनपिंग यांच्यातील चर्चेत बीजिंगमध्ये होणाऱ्या आगामी शांघाय शिखर परिषदेवर साधकबाधक चर्चा झाली.
रशिया - युक्रेन युद्धाची तीन वर्षे
आज रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन तीन वर्ष पूर्ण झाली. याच दिवशी २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. २०२२ मध्येही युद्ध सुरू होण्यापूर्वी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी शी जिनपिंग यांचीही भेट घेतली होती. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन आता तीन वर्षे उलटून गेली तरीही युद्ध थांबलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेनमधील युद्ध रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. इतरही अनेक देशांंचे राष्ट्रप्रमुख या प्रयत्नात आहेत, पण युद्ध केव्हा थांबेल याची कल्पना अद्यापही कुणाला नाही.