Russia Ukraine War: युक्रेनमधील रणभूमी सोडून पळताहेत जगातील सर्वात क्रूर योद्धे, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 20:36 IST2022-03-21T20:34:17+5:302022-03-21T20:36:40+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या भीषण संघर्ष सुरू आहे. जवळपास महिना होत आला तरी हे युद्ध थांबलेले नाही. दरम्यान, युक्रेनचा पाडाव करण्यासाठी रशियाकडून विविध प्रकारची रणनीती आखण्यात आली.

Russia Ukraine War: युक्रेनमधील रणभूमी सोडून पळताहेत जगातील सर्वात क्रूर योद्धे, समोर आलं धक्कादायक कारण
किव्ह - रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या भीषण संघर्ष सुरू आहे. जवळपास महिना होत आला तरी हे युद्ध थांबलेले नाही. दरम्यान, युक्रेनचा पाडाव करण्यासाठी रशियाकडून विविध प्रकारची रणनीती आखण्यात आली. तसेच युक्रेनियन सैन्यामध्ये दहशत पसरावी म्हणून रशियाने खतरनाक समजले जाणारे चेचेन फायटर्सही युद्धाच्या मैदानात उतरवले होते. मात्र आता या चेचेन फायटर्सबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
युक्रेनच्या संरक्षण सेवेने दिलेल्या माहितीनुसार चेचेन योद्धे ज्यांना Kadyrovites असंही म्हटलं जातं. त्यांची पाळंमुळं युद्धभूमीतून उखडली गेली आहेत. ते युक्रेनमधील रणमैदान सोडून चेचेन्याची राजधानी असलेल्या ग्रोज्नीकडे पळ काढत आहेत.द मिररने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनच्या संरक्षण सेवेने दावा केला की, युद्धाच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये चेचेन योद्ध्यांच्या मृत्यूचा दर खूप वाढला आहे. त्यामुळे या चेचेन योद्ध्यांचा आत्मविश्वास खचला आहे. तसेच ते युद्धाचे मैदान सोडून परत चेचेन्यामध्ये पळ काढत आहेत.
चेचेन फायटर युद्ध सुरू होण्यापूर्वीच २४ फेब्रुवारीपासून चेचेन्यामध्ये हल्ले करत आहेत. मात्र त्यांना मोठ्या हानीचा सामना करावा लागला आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी पुतीन यांचे विश्वासू आणि चेचेन्यामधील सर्वात मोठे नेते रमजान कादिरोव्ह यांनी युक्रेनी सैनिकांना धमकी दिली होती. जे युक्रेनी सैनिक आत्मसमर्पण करण्यास नकार देतील, त्यांना तिथेच गोळ्या घालण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र या युद्धात चेचेन्याचे अनेक योद्धे मारले जात आहेत.
युद्धाच्या तीन दिवसांनंतर चेचेन योद्ध्यांच्या १४१ व्या मोटराइडज्ड रेजिमेंटचे कमांडर जनरल मागोमेद तुशायेव्ह याला युक्रेनी सैनिकांनी मारले. तर गोस्टोमेलच्या विमानतळावर चेचेन योद्ध्यांनी पॅराड्रॉप करण्याचा प्रयत्न केला. मात्र युक्रेनी सैनिकांनी पॅराशूटमधून उतरणाऱ्या शेकडो चेचेन योद्ध्यांना मारले. तर किव्हच्या दिशेने येणाऱ्या चेचेन योद्ध्यांचा ताफाही युक्रेनने नष्ट केला होता. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जीवितहानीमुळे चेचेन योद्धांचे मनोबल खच्ची झाले आहे. त्यामुळे बेलारूसमधून किव्हपर्यंत पोहोचलेल्या चेचेन योद्ध्यांना १३ मार्चला विमानांनी चेचेन्यामध्ये पाठवण्यात आले.