Russia Ukraine War : गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे. 'दोन दिवसांपासून आम्ही एकमेकांच्या ऊर्जा केंद्रावर हल्ला केलेला नाही', असं युक्रेनियन अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. सौदी अरेबियातील चर्चेनंतर व्हाईट हाऊसने दोन्ही बाजूंमधील कराराची घोषणा केली होती. या चर्चेचा केंद्रबिंदू ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले रोखणे हा होता, यावर दोन्ही बाजूंनी स्वतंत्रपणे सहमती दर्शविली.
व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, युक्रेनियन आणि रशियन नेतृत्वाने ऊर्जा केंद्रांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यावर सहमती दर्शवली. एका वरिष्ठ युक्रेनियन अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले की, २५ मार्चपासून रशियाने युक्रेनियन ऊर्जा सुविधांवर हल्ला केलेला नाही, त्यामुळे युक्रेनने कोणतेही प्रत्युत्तरात्मक हल्ले केलेले नाहीत.
बलुचिस्तानात पुन्हा रक्तरंजित खेळ, बंडखोरांनी बसवर हल्ला केला; ६ जणांचा मृत्यू
२५ मार्चपासून कोणतेही मोठे हल्ले नाहीत
"२५ मार्चपासून, आम्हाला ऊर्जा क्षेत्रावर कोणतेही थेट रशियन हल्ले दिसले नाहीत, म्हणून आम्ही त्यांच्यावरही हल्ला केलेला नाही," असे युक्रेनियन अधिकाऱ्याने गुरुवारी रशियन लक्ष्यांचा संदर्भ देत सांगितले. दोन्ही बाजूंनी काळ्या समुद्रात हल्ले थांबवण्यास सहमती दर्शविली आहे, जरी मॉस्कोने यापूर्वी त्यांच्या कृषी निर्यातीवरील निर्बंध कमी करण्याची मागणी केली होती, असं अमेरिकेने म्हटले आहे.
१९ मार्च रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या फोन कॉलमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ३० दिवसांसाठी असे हल्ले थांबवण्याचे मान्य केल्यानंतरही रशियाने युक्रेनियन ऊर्जा सुविधांवर हल्ले केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. "१८ ते २५ मार्च दरम्यान, युक्रेनियन ऊर्जा सुविधांवर आठ हल्ले झाले - दोन बॉम्ब आणि सहा ड्रोन हल्ले," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.