रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 20:09 IST2025-12-22T20:09:03+5:302025-12-22T20:09:34+5:30
Russia Ukraine War: रशियन अधिकाऱ्यांनी या हत्येशी युक्रेनियन संबंधाचा तपासही सुरू केला आहे.

रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
Russia Ukraine War: युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला सोमवारी मोठा धक्का बसला. मॉस्कोमध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोटात रशियन सैन्याचा एक लेफ्टनंट जनरल ठार झाला. लेफ्टनंट जनरलची ओळख ५६ वर्षीय फॅनिल सर्वारोव्ह अशी झाली आहे. रशियन तपास समितीचे म्हणणे आहे की, तो कार चालवत होता, त्यावेळीच कारचा स्फोट झाला. बीबीसीच्या वृत्तानुसार, लेफ्टनंट जनरल सर्वारोव्ह हे सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल ट्रेनिंग विभागाचे प्रमुख होते. रशिया-युक्रेन युद्धाच्या मध्यातच सर्वारोव यांच्या हत्येने रशियाला मोठा धक्का बसला आहे. तपास समिती हा स्फोट कसा झाला याचा तपास करत आहे. रशियन अधिकाऱ्यांनी या हत्येशी युक्रेनियन संबंधाचा तपासही सुरू केला आहे.
रशियन सरकारच्या म्हणण्यानुसार, सर्वारोव्ह मॉस्कोमधील त्यांच्या अपार्टमेंटमधून कुठेतरी जाण्यासाठी बाहेर पडत असताना त्यांच्या कारमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सर्वारोव्हच्या हत्येची माहिती देण्यात आली आहे. कार स्फोटात उच्चपदस्थ रशियन लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू होण्याची ही दोन वर्षातील तिसरी मोठी घटना आहे.
फनिल सर्वारोव्ह कोण होते?
मिलिटरी एनवाय नुसार, सर्वारोव्ह यांचा जन्म १९६९ मध्ये रशियातील पर्म प्रदेशातील ग्रेम्याचिन्स्क येथे झाला. ते १९९० मध्ये रशियन सैन्यात सामील झाले आणि त्यांनी काझान हायर टँक कमांड स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. २००८ मध्ये, सर्वारोव्ह यांना रशियन सशस्त्र दलांचे जनरल स्टाफ प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. रशियामध्ये सर्वारोव्ह हे व्लादिमीर पुतिन यांचे जवळचे सहकारी मानले जात होते. सर्वारोव्ह यांनी २०१५-१६ मध्ये सीरियामधील युद्धाचे नेतृत्व केले होते. युक्रेनशी झालेल्या युद्धादरम्यान, त्यांची भूमिका सैन्याला प्रशिक्षण देणे आणि सैन्य तैनात करणे हे होते.