Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धात रशियाचं प्रचंड नुकसान; संतापलेल्या पुतीन यांची मोठी कारवाई, आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 14:48 IST2022-04-12T14:45:46+5:302022-04-12T14:48:04+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनविरुद्धच्या युद्धात अंदाज चुकले; भडकलेल्या पुतीन यांची मोठी कारवाई

Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धात रशियाचं प्रचंड नुकसान; संतापलेल्या पुतीन यांची मोठी कारवाई, आदेश जारी
मॉस्को: युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाचं प्रचंड मोठं नुकसान झालं. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धात रशियाला अनेक आघाड्यांवर फटका सहन करावा लागला. युक्रेन आठवडाभरात शरणागती पत्करेल असा अंदाज पुतीन यांनी बांधला होता. मात्र पुतीन यांचे आडाखे चुकले. युक्रेन युद्धात झालेल्या नुकसानामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन संतापले आहेत. त्यांनी १५० गुप्तहेरांना निलंबित केलं आहे. अनेक गुप्तहेरांना तुरुंगात पाठवलं आहे.
रशियन गुप्तचर यंत्रणा एफएसबीच्या गुप्तहेरांविरोधात पुतीन यांनी मोठी कारवाई केली आहे. अनेक गुप्तहेरांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. एफएसबी सोव्हिएत युनियनच्या काळात केजीबी म्हणून ओळखली जायची. पुतीन यांनी केजीबीसाठी काम केलं आहे. त्यानंतर हेरगिरीसाठी सोडून ते राजकारणात आले.
पुतीन यांनी निलंबित केलेले गुप्तहेर पाचव्या सर्व्हिसचे असल्याचं समजतं. १९९८ मध्ये ही तुकडी स्थापन करण्यात आली. त्यावेळी पुतीन एफएसबीचे संचालक होते. कधीकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या देशांमध्ये हेरगिरी करण्याचं काम या तुकडीकडे होतं. पाचव्या सर्व्हिसचे प्रमुख असलेल्या ६८ वर्षांच्या कर्नल जनरल सर्गेई बेसेदा यांना नदरकैदेत ठेवण्यात आलं आहे. युक्रेनमधील अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई होऊ शकते. बेलिंगकेट या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
रशियाच्या हल्ल्याआधी युक्रेनमधील परिस्थितीची चुकीची माहिती दिल्याचा ठपका गुप्तहेरांवर ठेवण्यात आला. रशियन अध्यक्षांच्या कार्यालयाला खोटी माहिती दिल्यानं त्यांच्यावर कारवाई झाली. रशियन सैन्यानं हल्ला केल्यास युक्रेनमधील जनता कारवाईचं स्वागत करेल. त्यामुळे वेगानं विजय मिळवता येईल, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेनं दिली होती. मात्र प्रत्यक्षात युक्रेनमधील परिस्थिती उलट होती.