युक्रेन उद्ध्वस्त केल्यानंतर आता या देशांवर हल्ला करण्याची रशियाची धमकी, युरोपियन देश चिंतीत, नाटोच्या प्रमुखांची युक्रेनमध्ये धाव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 11:19 IST2025-04-16T11:18:30+5:302025-04-16T11:19:00+5:30

Russia Ukraine War: गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेन पुरता बेचिराख झाला आहे.अशा परिस्थितीत आता युरोपमधील आणखी काही देश युद्धाच्या वरवंट्याखाली भरडले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Russia Ukraine War: After destroying Ukraine, Russia threatens to attack these countries, European countries are worried, NATO chiefs rush to Ukraine | युक्रेन उद्ध्वस्त केल्यानंतर आता या देशांवर हल्ला करण्याची रशियाची धमकी, युरोपियन देश चिंतीत, नाटोच्या प्रमुखांची युक्रेनमध्ये धाव  

युक्रेन उद्ध्वस्त केल्यानंतर आता या देशांवर हल्ला करण्याची रशियाची धमकी, युरोपियन देश चिंतीत, नाटोच्या प्रमुखांची युक्रेनमध्ये धाव  

गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेन पुरता बेचिराख झाला आहे. युक्रेनियन सैन्य रशियाच्या बलाढ्य सैन्यदलाचा निकराने सामना करत आहे. मात्र या प्रदेशात अजूनही शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाही. अशा परिस्थितीत आता युरोपमधील आणखी काही देश युद्धाच्या वरवंट्याखाली भरडले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रशियाने दिलेल्या एका धमकीनंतर आता व्लादिमीर पुतीन हे पोलंड आणि इतर बाल्टिक देशांवर हल्ला करणार की काय? अशी शंका उपस्थित केल जात आहे.

रशियाच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख सर्गेई नारिश्किन यांनी नाटोला दिलेल्या धमकीनंतर ही भीती व्यक्त केली जात आहे. नारिश्किन यांनी नाटोला धमकी देताना सांगितले की, जर पोलंड आणि बाल्टिक देशांनी आपल्या आक्रमक कारवाया रोखल्या नाहीत, तर रशियाकडून प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्यात येईल. एकीकडे रशियाकडून युक्रेनवरील आक्रमणाची धार वाढवून बॉम्बफेक अधिक तीव्र करण्यात आली असतानाच पोलंड आणि इतर बाल्टिक देशांनाही रशियाकडून ही धमकी देण्यात आली आहे.

सर्गेई नारिश्किन यांनी मंगळवारी बेलारूसचे प्रमुख अलेक्झँडर लुकाशेंको यांची भेट घेतली. या भेटीनंतर नारिश्किन यांनी सांगितले की, जर नाटोने रशिया आणि बेलारूसबाबत आक्रमक धोरणं स्वीकारलं, तर सर्वप्रथम पोलंड आणि बाल्टिक देशांचं नुकसान होईल, असा इशाराही नारिश्किन यांनी दिला. यावेळी नारिश्किन यांनी पोलंडसह लाटव्हिया, लिथुआनिया आणि एस्टोनिया या देशांवर चिथावणी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी पोलंडकडून बेलारूस आणि रशियाच्या कलिनिनग्राड येथील सीमेवर २० लाख भूसुरुंग पोरण्यात आल्याच्या योजनेचाही उल्लेख केला.

दरम्यान, नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी मंगळवारी झेलेन्स्की यांच्यासोबत ओडेसा भागाचा दौरा केला आहे. तसेच युक्रेनला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. रशियाने या युद्धामध्ये आक्रमण केले आहे, यात कुठलीही शंका नाही, असे रुटे यांनी यावेळी सांगितले.   

Web Title: Russia Ukraine War: After destroying Ukraine, Russia threatens to attack these countries, European countries are worried, NATO chiefs rush to Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.