Russia-Ukraine War Crisis : रशियाचा युक्रेनवर हल्ला? डोनेत्स्कमध्ये 5 स्फोट, UNSCची आपत्कालीन बैठक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 08:48 IST2022-02-24T08:48:49+5:302022-02-24T08:48:56+5:30
रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केले आहेत. अधिकार्यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे.

Russia-Ukraine War Crisis : रशियाचा युक्रेनवर हल्ला? डोनेत्स्कमध्ये 5 स्फोट, UNSCची आपत्कालीन बैठक सुरू
रशिया आणि युक्रेन आता युद्धाच्या अगदी जवळ पोहोचल्याचे दिसत आहे. फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क शहरात गुरुवारी पहाटे किमान पाच स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यानंतर लष्कराचे चार ट्रक घटनास्थळी रवाना झाले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे, संभाव्य रशियन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने आपली काही विमानतळे बंद केली आहेत.
रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केले आहेत. अधिकार्यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं बोलावली आपत्कालीन बैठक -
एएफपी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीन दिवसांत दुसऱ्यांदा आपत्कालीन सत्र बोलावले आहे. यात युक्रेन संकटावर चर्चा होणार आहे. सीमेवर रशियन सैन्याची तैनाती सुरू आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, कीवच्या विनंतीवरून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
लष्कराचे दोन ताफे डोनेत्स्कच्या दिशेने गेल्याचा दावा -
दोन रशियन लष्करी ताफे बुधवारी पूर्व युक्रेनच्या अशांत डोनेत्स्कडे जात असल्याचा दावा करण्यात आला होता. एवढेच नाही, तर बुधवारी काही प्रसारमाध्यमांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने, आधुनिक लष्करी सामग्रीसह सज्ज असलेले दोन ताफे डोनेत्स्कच्या दिशेने वेगाने जात आहेत, असे म्हटले होते. मात्र, या ताफ्यांमधील लष्करी वाहनांवर कोणत्याही देशाचे चिन्ह नाही, असा दावाही प्रत्यक्षदर्शिंनी केला आहे.
रशियाने नुकतेच पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क आणि डोनेत्स्क भागांना स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे आणि तेथे आपले सैन्य पाठविण्याचे आदेशही दिले आहेत.