Russia Ukraine Crisis : "मी भारतात पाय ठेवला अन् चर्नीव्हिन्सीमध्ये झाला हल्ला"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 06:19 IST2022-02-25T06:17:58+5:302022-02-25T06:19:04+5:30
Russia Ukraine Crisis : युक्रेनमधून मायदेशी सुखरूप परतलेल्या मोक्षदाचा अनुभव

Russia Ukraine Crisis : "मी भारतात पाय ठेवला अन् चर्नीव्हिन्सीमध्ये झाला हल्ला"
हणमंत गायकवाड
लातूर : मी चर्नीव्हिन्सीतून २१ फेब्रुवारीला निवासस्थान सोडले अन् किव्ह येथून विमानात बसून मुंबईत २३ फेब्रुवारीला परतले आणि तिकडे हल्ला झाला. एरव्ही एक दिवस दोन तासामध्ये भारतात पोहोचत असे; पण या युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागला. विमानातून मुंबईत उतरल्यानंतर जीव भांड्यात पडला. समोर वडिलांना पाहून चर्नीव्हिन्सी विसरून गेले, अशी भावना युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या मोक्षदा कदमने व्यक्त केली.
चर्नीव्हिन्सीमध्ये गॅस, पाणी आणि करन्सीची समस्या निर्माण होईल. युद्धाचा भडका कधीही होईल, असे गेल्या आठवड्यापासून सांगितले जात होते. त्यामुळे डॉलर चेंज करून सोबत ठेवा, गॅस, पाण्याचाही साठा ठेवण्याच्या सूचना आमच्या शिक्षकांकडूनही केल्या जात होत्या. त्याचवेळी मी गावाकडे येण्याचा निर्णय घेतला.
वडिलांनीही तत्काळ परत निघण्याचा सल्ला दिला, पण विमानाचे तिकीट मिळत नव्हते. दोन-तीन दिवसांच्या वेटिंगनंतर तिकीट मिळाले आणि बुधवारी रात्री भारतात पोहोचले. गुरुवारी सकाळी लातूरमध्ये पोहोचले, तर तिथे हल्ला झाल्याची बातमी ऐकायला मिळाली. माझ्या निवासस्थान परिसराच्या पाच-दहा किलोमीटर अंतरात हे हल्ले झाले आहेत. त्यामुळे मायदेशात सुखरूप परतल्याचा आनंद असल्याचे मोक्षदा म्हणाली.
परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा जाणार
पश्चिम युक्रेनमध्ये धोका नाही, असे सांगितले जात होते; पण तेथेही हल्ला झाला. पूर्व युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती मी येण्यापूर्वीच होती, असे बातम्यांत पाहिले होते. असो, आता मी भारतात पोहोचले आहे. सगळे निवळल्यानंतरच पुढील शिक्षणासाठी युक्रेनला जाण्याचा विचार करीन, असेही मोक्षदाने सांगितले.