Russia Ukraine War: रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 09:31 IST2022-03-03T09:28:57+5:302022-03-03T09:31:28+5:30
रशिया युक्रेनवर हल्ला करणार यासंदर्भातही चीनला माहिती होती, असे संकेत गुप्तचर खात्याच्या अहवालातून मिळतात, असे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.

Russia Ukraine War: रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती
वॉशिंग्टन - रशिया आणि युक्रेन यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. पण, रशिया युक्रेनवर हल्ला करणार, हे चीनला आधीपासूनच माहीत होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, बिजिंग विटर ऑलिम्पिक होईपर्यंत युक्रेनवर हल्ला करणे टाळावे, असे चीनने रशिला सांगितले होते, असा खळबळजनक दावा माध्यमातील वृत्तांनी केला आहे.
चीनने रशियासोबत केली होती चर्चा -
द गार्डियनमधील प्रसिद्ध वृत्तानुसार, रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्या पूर्वी फेब्रुवारीच्या सुरुवातीला चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. बिजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिक संपण्यापूर्वी युक्रेनवर हल्ला करू नये, असे चिनी अधिकाऱ्यांनी म्हटले होते. यासंदर्भात माहिती देताना न्यू यॉर्क टाईम्सने, बायडेन प्रशासनातील अधिकारी आणि एका युरोपियन अधिकाऱ्याचा हवाला दिला आहे.
माहीत होती संपूर्ण योजना -
चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रशियाच्या योजनेसंदर्भात आधीपासूनच माहिती होती. याच बरोबर रशिया युक्रेनवर हल्ला करणार यासंदर्भातही चीनला माहिती होती, असे संकेत गुप्तचर खात्याच्या अहवालातून मिळतात, असेही न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.
अहवाल निराधार - चीन
यासंदर्भात बोलताना, वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिउ पेंग्यू म्हणाले, संबंधित रिपोर्टला कसल्याही प्रकारचा आधार नाही. याचा उद्देश केवळ चीनला दोष देणे आणि त्याच्यावर डाग लावणे एवढाच आहे. यावर अमेरिकन परराष्ट्र विभागाने, CIA आणि व्हाईट हाऊसच्या राष्ट्रिय सुरक्षा परिषदेने अद्याप कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, चीन आणि रशियन अधिकाऱ्यांत झालेल्या चर्चेची गुप्त माहिती एका पाश्चिमात्य गुप्तचर सर्व्हिसने एकत्रित केली होती आणि याची समीक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ती विश्वसनीय असल्याचे म्हटले होते.
चर्चेचे ठोस पुरावे नाहीत -
टाईम्सच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, गुप्त माहिती माहीत होती. पण यावरू, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पुतिन यांच्या पातळीवर काही चर्चा झाल्याचे स्पष्ट होत नाही.