“पुतिन घाबरले, स्वत:च्याच सैन्याने पाठीत खंजीर खुपसल्याने लपून बसले”; झेलेन्स्कींनी फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 15:07 IST2023-06-25T15:06:16+5:302023-06-25T15:07:07+5:30
Volodymyr Zelenskyy On Russia Rebellion: रशियातील घडामोडींवर भाष्य करताना झेलेन्स्की यांनी पुतिन यांना चांगलेच सुनावले आहे.

“पुतिन घाबरले, स्वत:च्याच सैन्याने पाठीत खंजीर खुपसल्याने लपून बसले”; झेलेन्स्कींनी फटकारले
Volodymyr Zelenskyy On Russia Rebellion: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात रशियातील वैगनर या खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी पुकारलेले बंड काही तासांमध्येच थंड झाले. आता मॉस्कोकडे जाऊ नये, माघार घ्यावी आणि परत युक्रेनमधील आपल्या कॅम्पमध्ये परतावे, असे आदेश प्रीगोझिन आपल्या खासगी लष्कराला दिले आहेत. रशियात रशियाचे रक्त सांडू नये, यासाठी आपण माघार घेत असल्याचे प्रीगोझिन यांनी म्हटले आहे. यावरून आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या घडामोडींवर भाष्य करताना पुतिन यांच्यावर टीका केली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. वॅगनर सैन्याने पुकारलेल्या बंडाला स्वत: पुतिन जबाबदार आहेत. पुतीन यांनीच ही परिस्थिती स्वत:वर ओढवून घेतली असून आता ते घाबरले आहेत. पुतीनच्या आदेशाने रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला होता आणि त्यावेळी एका दिवसात युक्रेनमधील लाखो लोक मारले गेले. हे सर्व करण्यासाठी रशियाने खासगी भाडोत्री सैन्याचा वापर केल्यामुळे झाले. रशियाच्या खासगी सैन्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा वापर केला आणि युक्रेनमध्ये दहशत निर्माण केली होती. याच भाडोत्री सैनिकांनी रशियामध्येच खळबळ माजवली आहे आणि आता पूर्ण जग हे दृश्य बघत आहे, अशी टीका झेलेन्स्की यांनी केली.
पुतिन घाबरले, स्वत:च्याच सैन्याने पाठीत खंजीर खुपसल्याने लपून बसले
क्रेमलिनमधील तो व्यक्ती आता प्रचंड घाबरलेला आहे आणि कुठेतरी लपून बसली आहे. पुतिन यांनी स्वत:च स्वत:वर धोका ओढवून घेतला आहे. जगाने रशियाने माजवलेल्या अराजकतेला शांतपणे सामोरे जाऊ नये, असे आवाहन करत, युक्रेनवर आलेल्या संकटाला जबाबदार असणाऱ्या पुतीन यांचं उघडपणे नाव घेण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत जगाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आणि पुतिन या सर्व प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्षम आहे असे समजले तर येणाऱ्या काळात जगापुढे धोका निर्माण होऊ शकतो, असे झेलेन्स्की यांनी सांगितले.
दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी वॅगनर ग्रुप या प्रायव्हेट आर्मीचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्याकडून करण्यात आलेल्या सशस्त्र बंडाच्या घोषणेला विश्वासघात आणि रशियाच्या पाटीत सुरा खुपसणारं पाऊल म्हटले आहे. तसेच हे कटकारस्थान रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला आहे.