ज्या देशावर ट्रम्पना ताबा मिळवायचा, त्या देशात रशियाने पाठवले तेल टँकर; ऊर्जा संकटातून दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:04 IST2026-03-30T16:03:43+5:302026-03-30T16:04:51+5:30
Russia-Cuba-US: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे या देशात गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे.

ज्या देशावर ट्रम्पना ताबा मिळवायचा, त्या देशात रशियाने पाठवले तेल टँकर; ऊर्जा संकटातून दिलासा
Russia-Cuba-US: अमेरिकेकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्या आणि ऊर्जा संकटाचा सामना करणाऱ्या क्युबाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून क्युबाला तेलाचा पुरवठा मिळाला नव्हता, ज्यामुळे देशात गंभीर वीज आणि इंधन संकट निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत, रशिया क्युबाच्या मदतीसाठी पुढे आला आहे. रशियाने आपले एक मोठे तेल टँकर क्युबात पाठवले आहे.
रशियाचा तेल टँकर क्युबात दाखल
गेल्या तीन महिन्यांत क्युबात एकही मोठे तेल टँकर पोहोचले नव्हता, ज्यामुळे देशात गंभीर ऊर्जा संकट तीव्र झाले होते. मात्र, आता रशियाचे ‘अनातोली कोलोडकिन’ हे तेल टँकर सुमारे एक लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन क्युबात पोहोचले आहे. रशियाच्या परिवहन मंत्रालयाने याची अधिकृत पुष्टी केली आहे. सध्या हा टँकर मातान्जास बंदरात तेल उतरवण्याची तयारी करत आहे. यामुळे क्युबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेच्या धोरणामुळे तेल पुरवठा थांबला
या संकटामागे अमेरिकेच्या धोरणांचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेने व्हेनेझुएलामधील राजकीय बदलानंतर व्हेनेझुएलाकडून क्युबाला होणारा तेल पुरवठा बंद केला होता. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला होता की, क्युबाला तेल पुरवणाऱ्या देशांवर मोठे टॅरिफ लावले जातील. या दबावामुळे क्युबाला मोठ्या प्रमाणात तेल पुरवणाऱ्या मेक्सिकोनेही तेल पुरवठा बंद केला होता.
ट्रम्प यांनी अचानक भूमिका का बदलली?
मात्र, रविवारी अचानक ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलली आणि कोणत्याही देशाने क्युबाला तेल पुरवले तरी अमेरिकेला हरकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर लगेचच रशियाचा तेल टँकर क्युबाकडे रवाना झाला. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डायझ-कॅनेल यांनी यापूर्वीच सांगितले होते की, तीन महिन्यांपासून देशात एकही तेल टँकर आलेला नाही आणि देश गंभीर ऊर्जा संकटातून जात आहे.
क्युबामध्ये वीज आणि इंधन संकट
तेल पुरवठा थांबल्यामुळे क्युबामध्ये गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. देशभरात दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहू लागला आणि पेट्रोल विक्रीवर कठोर मर्यादा लावण्यात आल्या. क्युबाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ऊर्जा संकटाचा सर्वात वाईट परिणाम कर्करोगाच्या रुग्णांवर, विशेषतः लहान मुलांवर झाला. मात्र, आता रशियाकडून आलेल्या तेलामुळे क्युबाला वीज आणि इंधन संकटातून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.