8 मिनिटांत 900 कोटींची चोरी; कमकुवत पासवर्डमुळे झाली सर्वात मोठी चोरी, जाणून घ्या प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:19 IST2025-11-06T16:19:43+5:302025-11-06T16:19:53+5:30
या चोरीच्या घटनेची जगभरात चर्चा सुरू आहे.

8 मिनिटांत 900 कोटींची चोरी; कमकुवत पासवर्डमुळे झाली सर्वात मोठी चोरी, जाणून घ्या प्रकरण...
जगातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक संग्रहालयांपैकी एक असलेले फ्रान्समधील "लूव्र म्युझियम" पुन्हा एकदा सुरक्षेच्या त्रुटींमुळे चर्चेत आले आहे. 19 ऑक्टोबर रोजी दिवसाढवळ्या येथे घडलेल्या चोरीच्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. तपासानुसार, संग्रहालयातील सुरक्षा व्यवस्था केवळ जुनीच नव्हती, तर सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने अत्यंत कमजोर असल्याची माहिती समोर आली आहे.
फक्त LOUVRE टाइप करून मिळाला सर्व्हरचा अॅक्सेस!
फ्रेंच वृत्तसंस्था लिब्रेशनच्या अहवालानुसार, लूव्रमध्ये वापरला जाणारा सुरक्षा नेटवर्क आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टम दशकांपासून अद्ययावत करण्यात आली नव्हती. इतकेच नव्हे, तर LOUVRE हा शब्द टाइप केल्यावर संग्रहालयाच्या व्हिडिओ सर्व्हिलन्स सर्व्हरला अॅक्सेस मिळत होता. त्याचप्रमाणे THALES टाइप केल्यास थेल्स ग्रुपने तयार केलेला दुसरा सुरक्षा सॉफ्टवेअर उघडत होता.
2014 पासूनच मिळत होत्या चेतावण्या
डिसेंबर 2014 मध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्थेने (ANSSI) या म्युझियमच्या सुरक्षा नेटवर्कचा ऑडिट अहवाल सादर केला होता. 26 पानांच्या या अहवालात अनेक गंभीर त्रुटी दाखवून देण्यात आल्या होत्या. या नेटवर्कमध्ये अलार्म सिस्टीम, व्हिडिओ मॉनिटरिंग आणि प्रवेश नियंत्रण या सगळ्याच गोष्टींचा समावेश होता. एजन्सीने स्पष्ट इशारा दिला होता की, कमजोर पासवर्ड आणि जुना नेटवर्क सॉफ्टवेअरमुळे हॅकर्सना सहज प्रवेश मिळू शकतो आणि ते व्हिडिओ फीड किंवा एक्सेस कंट्रोल बदलू शकतात.
संग्रहालयाने योग्य पाऊले उचलली नाही
एजन्सीने त्या वेळी पासवर्ड मजबूत करण्याचा आणि सिस्टम अपग्रेड करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, म्युझियम प्रशासनाने या सूचनांनंतर प्रत्यक्षात काय बदल केले, याबाबत त्यांनी कधीही सार्वजनिक माहिती दिली नाही. 2017 मधील आणखी एका ऑडिटमध्येही अशाच त्रुटी आढळल्या होत्या, म्हणजेच समस्या कायम राहिली होती.
फक्त 8 मिनिटांत 900 कोटींची चोरी
19 ऑक्टोबर रोजीच्या चोरीने तर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. चार चोरांनी केवळ 8 मिनिटांत 8.8 मिलियन युरो (सुमारे 900 कोटी रुपये) किमतीचे दागिने लुटले. ही संपूर्ण घटना एखाद्या चित्रपटासारखी वाटावी अशी होती. चोरांनी बास्केट लिफ्टद्वारे भिंतीवर चढून, खिडकी तोडून, डिस्प्ले केसमधील दागिने काढले आणि क्षणात फरार झाले. या चोरीच्या तपासात काही संशयितांना अटक करण्यात आली आहे, परंतु घटनेने म्युझियमच्या सुरक्षा यंत्रणांवर आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.