श्रीलंकेतील स्फोटांमागे धनाढ्य कुटुंब; हल्लेखोरांत दोन सख्खे भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 03:26 AM2019-04-26T03:26:54+5:302019-04-26T03:27:10+5:30

वडिलांना केली अटक; आगमन व्हिसाची सुविधा केली स्थगित

The rich family behind the Sri Lankan blasts; The two brothers are in the attack | श्रीलंकेतील स्फोटांमागे धनाढ्य कुटुंब; हल्लेखोरांत दोन सख्खे भाऊ

श्रीलंकेतील स्फोटांमागे धनाढ्य कुटुंब; हल्लेखोरांत दोन सख्खे भाऊ

Next

कोलंबो : शहराच्या महावेला गार्डन परिसरातील तीन मजली घराच्या बाजूला राहत असलेल्या फातिमा फैजल यांनी असा विचार केला नव्हता की, त्यांचे शेजारी आगामी काळात किती बदनाम होणार आहेत. या भागात राहणाऱ्या दोन भावांचे नाव स्फोटातील प्रमुख आरोपी म्हणून पुढे आले आहे. हे अतिशय नावाजलेले धनाढ्य कुटुंब आहे.

या कुटुंबीयांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, कॉपर फॅक्ट्रीचा मालक इन्शाफ इब्राहिमने (३३) लक्झरी शांगरी-ला हॉटेलमध्ये स्फोट केला. पोलीस जेव्हा त्यांच्या घरी धाड टाकण्यासाठी गेले तेव्हा त्याच्या लहान भावाने इल्हाम इब्राहिमने स्फोट घडवून आणला. यात त्याच्यासह त्याची पत्नी आणि दाम्पत्याची तीन मुले ठार झाली. या घराशेजारी राहणाºया फैजल म्हणाल्या की, ते चांगल्या लोकांपैकी एक वाटत होते. स्थानिक मीडियाने या भावांची नावेही जाहीर केली आहेत.

पोलिसांनी सांगितले की, या भावांच्या वडिलांना मोहम्मद इब्राहिम यांना अटक करण्यात आली आहे. मसाला व्यापारी म्हणून ख्याती असणाºया इब्राहिम यांना सहा मुले आणि तीन मुली आहेत. गरिबांना मदत करण्यासाठी ते या भागात प्रसिद्ध आहेत. फैजल म्हणतात की, त्यांनी जे काही केले आहे त्यामुळे सर्व मुस्लिमांकडे संशयाने बघितले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इल्हाम इब्राहिम कट्टरवादी विचारांचा होता. नॅशनल तौहीद जमात या स्थानिक इस्लामिक गटाच्या बैठकींना तो हजर होता. या संघटनेने हल्ल्याची योजना केल्याचा संशय आहे. त्याचा भाऊ इन्शाफ हा काहीसा मवाळ होता. आपल्या कर्मचाऱ्यांना दान देणे यासाठी तो ओळखला जायचा. त्याने एका धनाढ्य ज्वेलर्स व्यापाºयाच्या मुलीशी विवाह केला होता. त्याला पैशांची कसलीही समस्या नव्हती. इब्राहिम यांच्या शेजारी राहणाºया ३८ वर्षीय एका इंजिनिअरने संजीवा जयसिंघे यांनी सांगितले की, हे ऐकून आम्हाला तर धक्काच बसला आहे. आम्ही कधी विचार केला नव्हता की, ते अशा प्रकारचे लोक असतील. 

चर्चमधील प्रार्थना तूर्तास स्थगित
श्रीलंकेतील कॅथोलिक चर्चने स्पष्ट केले आहे की, सुरक्षा स्थितीत सुधारणा होईपर्यंत सामूहिक प्रार्थना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक कॅथोलिक चर्चचे प्रमुख कार्डिनल मॅल्कम रंजित यांनी असा दावा केला की, ताकदवान देशांच्या समर्थनाने एका संघटित समूहाने हे हल्ले केले.

स्फोटप्रकरणी आणखी १६ जणांना अटक
कोलंबो : श्रीलंकेत ईस्टर संडेला चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोट प्रकरणात अन्य १६ जणांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच अटक करण्यात आलेल्या लोकांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या ३५९ झाली आहे, तर अन्य ५०० लोक जखमी झाले आहेत. श्रीलंकेतील अधिकारी सैन्याच्या मदतीने तपास करीत आहेत.

अटक करण्यात आलेल्या लोकांची चौकशी तपास अधिकारी करीत आहेत. अधिकाºयांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या अनेकांचे तौहीद जमातसोबत (एनटीजे) संशयित संबंध आहेत. अर्थात, एनटीजेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत आत्मघाती हल्लेखोरांची ओळखही सांगितली आहे. तपास अभियानासाठी पोलिसांच्या मदतीला देशात ५००० सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, पुगोडात मॅजिस्ट्रेट न्यायालयाच्या मागे एक लहान स्फोट झाला. यात कुणालाही इजा झाली नाही.

बॉम्बस्फोटात आणखी एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला असून, मृत भारतीय नागरिकांची संख्या ११ वर पोहोचली आहे. श्रीलंकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे की, मृत विदेशी नागरिकांची संख्या ३६ झाली आहे. यात बांगलादेशातील एक, चीनचे दोन, भारताचे ११, डेन्मार्कचे ३, जपानचा एक, नेदरलँडचा एक, पोर्तुगालचा एक, सौदी अरेबियाचे दोन, स्पेनचा एक, तुर्कीचे दोन, यूकेचे सहा आणि एक अमेरिकी नागरिक यांचा समावेश आहे.

ड्रोन, मानवरहित विमानांवर प्रतिबंध
श्रीलंकेत झालेल्या स्फोटानंतर देशात ड्रोन आणि मानवरहित विमानांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे. नागरी उड्डयन प्राधिकरणाने म्हटले आहे की, हे प्रतिबंध पुढील सूचनेपर्यंत लागू असतील.
३९ देशांच्या नागरिकांना श्रीलंकेत आगमनाची सुविधा देणारी आपली योजना श्रीलंकेने गुरुवारी स्थगित केली आहे. पर्यटन मंत्री जॉन अमारातुंगा यांनी सांगितले की, सुरक्षेची परिस्थिती पाहता काही काळासाठी या व्हिसाला स्थगिती देण्यात आली आहे. हल्लेखोरांचा विदेशी संपर्क तपासात दिसून आला असून, या सुविधेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला
आहे. 

श्रीलंकेच्या संरक्षण सचिवांचा राजीनामा
चर्चेस, हॉटेल्स आदी ठिकाणी रविवारी झालेल्या आत्मघाती बाँबहल्ल्यांनंतर श्रीलंकेचे संरक्षण सचिव हेमासिरी फर्नांडो यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला. पुरेशी आधी गुप्त माहिती असतानाही हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल देशाचे अध्यक्ष मैथ्रीपाला सिरिसेना यांनी फर्नांडो आणि पोलीस महानिरीक्षक पुजिथ जयसुंदरा यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.

Web Title: The rich family behind the Sri Lankan blasts; The two brothers are in the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.