गुगलने काढले, आता त्यांनी बनविली स्वत:चीच कंपनी; इतर कर्मचाऱ्यांचीही साथ मिळाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 10:30 IST2023-02-23T10:30:03+5:302023-02-23T10:30:20+5:30
किर्क यांनी गुगलमध्ये तब्बल आठ वर्षे वरिष्ठ पदावर काम केले. १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या मोहिमेत त्यांची नोकरी गेली.

गुगलने काढले, आता त्यांनी बनविली स्वत:चीच कंपनी; इतर कर्मचाऱ्यांचीही साथ मिळाली
न्यूयॉर्क - गुगलमध्ये वरिष्ठ व्यवस्थापनात काम करणाऱ्या हेनरी किर्क यांना कंपनीने अलीकडेच नोकरीवरून काढून टाकले आहे. किर्क यांनी परिस्थितीला शरण न जाता स्वत:ची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांना आणखी सहा निष्कासित कर्मचाऱ्यांचीही साथ मिळाली आहे.
किर्क यांनी गुगलमध्ये तब्बल आठ वर्षे वरिष्ठ पदावर काम केले. १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या मोहिमेत त्यांची नोकरी गेली. त्यांनी आता न्यूयॉर्क आणि सॅनफ्रान्सिस्को येथे एक डिझाइन व विकास स्टुडिओ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमानुसार देण्यात आलेल्या मुदतीप्रमाणे मार्चमध्ये किर्क यांचा गुगलमधील कार्यकाळ संपेल. त्याआधीच त्यांना आपल्या नव्या कंपनीचे कामकाज सुरू करायचे आहे. त्यासाठी त्यांच्या हातात आता फक्त ५२ दिवस आहेत.
जीवनातील आव्हानेच अद्वितीय संधी देतात
लिंक्डइनवर एक पोस्ट सामायिक करून आपल्या या उपक्रमाची माहिती किर्क यांनी दिली. त्यांनी म्हटले की, जीवनात आलेली आव्हानेच अद्वितीय संधी उपलब्ध करून देत असतात, असा माझा अनुभव आहे. मला मदतीची गरज आहे. कठोर मेहनत आणि परिणाम तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाऊ शकतात, असे माझे मत आहे.