"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:50 IST2025-09-24T09:45:45+5:302025-09-24T09:50:04+5:30
Marco Rubio on India Tariff: रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर २५ अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे. तो रद्द करण्याचे संकेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिले.

"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
Marco Rubio on Tariffs: 'भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अजूनही खूप महत्त्वाचे आहेत', असे म्हणत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी टॅरिफ कमी करण्यासंदर्भात एक महत्त्वाचे विधान केले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या भेटीनंतर दिलेल्या एका मुलाखतीत रुबियोंनी हे विधान केले आहे. भारतावर लावण्यात आलेला अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ कमी करण्याचे संकेत त्यांनी दिले.
रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने दंड म्हणून भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले. दरम्यान, दोन्ही देशात संवाद सुरूच असून, एस. जयशंकर यांनी मार्को यांनी मंगळवारी एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत भारतावर लादण्यात आलेल्या टॅरिफबद्दल भाष्य केले.
मार्को रुबियो टॅरिफबद्दल काय बोलले?
मुलाखतीत भारतावरील निर्बंधाबद्दल बोलताना रुबियो म्हणाले, "भारतासंदर्भात ज्या काही उपाययोजना करायच्या होत्या. त्या आपण बघितल्या आहेत. पण, तरीही काही गोष्टी आहेत ज्या ट्रम्प प्रशासन दुरुस्त करू शकते, अशी आम्हाला आशा आहे. अध्यक्षांकडे ती क्षमता आहे की ते आणखी गोष्टी करू शकतात. या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात झाली आहे", असे महत्त्वाचे विधान त्यांनी केले.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारत अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले. ट्रम्प यांच्याकडून भारतावर आघात करणारे निर्णय घेतले गेल्याने त्यात आणखी भर पडली. पण, गेल्या काही दिवसांत दोन्ही देशातील संवाद वाढला असून, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर रुबियो यांनी हे विधान केले आहे.
ट्रम्प रशियावर आणखी निर्बंध लादणार
रुबिया असेही म्हणाले की, "ट्रम्प रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून युक्रेनमध्ये केल्या जात असलेल्या कारवाईवर प्रचंड नाराज आहेत. दोन्ही नेते अलास्कामध्ये भेटल्यानंतरही हे सुरूच आहे. एका टप्प्यानंतर अध्यक्ष ट्रम्प हे रशियावर आणखी निर्बंध लादू शकतात. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. त्या दिशेने हालचाली सुरू आहेत", असेही रुबियो यांनी सांगितले.
"मला वाटते की, युरोपनेही रशियावर निर्बंध लादले पाहिजेत. पण, आजघडीला युरोपातील काही देश आहे, ते अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करत आहेत. जो की मुर्खपणा आहे. अमेरिकेने रशियावर आणखी निर्बंध लादावेत असे युरोप म्हणत आहे, पण युरोपातीलच देश पुरेसे प्रयत्न करत नाहीये", अशी नाराजी रुबियोंनी व्यक्त केली.