...अन् अचानक रस्त्यात फिरताना दिसू लागले निळे कुत्रे; पाहून स्थानिक बुचकळ्यात पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 15:25 IST2021-09-28T15:24:01+5:302021-09-28T15:25:56+5:30
अचानक रस्त्यावर दिसू लागले निळ्या रंगाचे कुत्रे; स्थानिकांना बसला धक्का

...अन् अचानक रस्त्यात फिरताना दिसू लागले निळे कुत्रे; पाहून स्थानिक बुचकळ्यात पडले
मॉस्को: प्राण्यांच्या प्रजातींचे रंग ठरलेले असतात. काही वेळा म्युटेशनमुळे प्राण्यांच्या रंगात थोडासा बदल होतो. मात्र रशियात चक्क निळ्या रंगाचे कुत्रे आढळून आले आहेत. यामागचं कारण प्राण्यांसह माणसांचीही चिंता वाढवणारं आहे. कुत्रे विविध रंगांचे असतात. मात्र निळ्या रंगांचे नसतात. त्यामुळेच या कुत्र्यांना नेमकं काय झालंय याचा शोध घेण्यात आला. प्रदूषणामुळे कुत्र्यांचा रंग बदलल्याचं अभ्यासातून पुढे आलं आहे.
या वर्षीच्या फेब्रुवारीत रशियाची राजधानी मॉस्कोपासून ३७० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जररिंस्क शहरात निळ्या रंगांचे कुत्रे दिसून आले. त्यामुळे स्थानिकांना धक्काच बसला. हे कुत्रे जवळच असलेल्या रसायनांच्या बंद पडलेल्या कारखान्यात जायचे. या कारखान्यातून निघणाऱ्या हानिकारक रसायनांबद्दल प्राणीप्रेमींनी शंका उपस्थित केली. या कारखान्यातून प्लेक्सीग्लास आणि हाइड्रोसायनिक वायू बाहेर सोडला जायचा.
कात्री-वस्तरा चालवताना ड्रीम टीम बनवली; IPL सामन्यामुळे सलून चालक झाला करोडपती
प्लेक्सीग्लास आणि हाइड्रोसायनिक वायूची निर्मिती हायड्रोजन सायनाईड पाण्यात मिसळल्यानं होते. हायड्रोजन सायनाईड अतिशय विषारी असतं. कारखान्यातून निघणाऱ्या कॉपर सल्फेटसारख्या रसायनांमुळे कुत्र्यांचा रंग बदलत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कुत्र्यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र रसायनांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रसायन प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबईतही घडला होता असाच प्रकार
रशियात आता घडलेला प्रकार नवी मुंबईत ४ वर्षांपूर्वी घडला होता. एका कारखान्यातून निघणारं केमिकलचं पाणी नाल्यात सोडण्यात आल्यानं ११ कुत्र्यांचा रंग बदलला. त्यांची त्वचा निळी झाली. यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळानं संबंधित कारखाना बंद केला.