नेपाळमध्ये 'रॅपर राज': बालेन शाह बनले देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान; 'जेन-झी' क्रांतीनं जुनी सत्ता उलथवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:16 IST2026-03-27T14:15:09+5:302026-03-27T14:16:40+5:30
विशेष म्हणजे, या सोहळ्यात हिंदू आणि बौद्ध परंपरांचा अप्रतिम संगम बघायला मिळाला. यावेळी, ब्राह्मणांनी शंखनाद केला, १०८ युवा ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन केले तसेच 107 लामांनी बौद्ध मंत्रांचे पठण केले.

नेपाळमध्ये 'रॅपर राज': बालेन शाह बनले देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान; 'जेन-झी' क्रांतीनं जुनी सत्ता उलथवली
काठमांडू - नेपाळच्या राजकारणात आज एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली. प्रसिद्ध रॅपर तथा इंजिनीअर बालेन शाह यांनी शुक्रवारी नेपाळच्यापंतप्रधानपदाची शपथ घेतली. ते वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान झाले आहेत. विशेष म्हणजे, मदेश क्षेत्रातून या सर्वोच्च पदावर पोहोचणारे ते पहिलेच लोकप्रतिनिधी आहेत.
राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्या उपस्थितीत 'शीतल निवास' येथे दुपारी १२:३४ वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, या सोहळ्यात हिंदू आणि बौद्ध परंपरांचा अप्रतिम संगम बघायला मिळाला. यावेळी, ब्राह्मणांनी शंखनाद केला, १०८ युवा ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन केले तसेच 107 लामांनी बौद्ध मंत्रांचे पठण केले.
१८२ जागांसह सत्तेत एन्ट्री -
नेपाळमध्ये ५ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत बालेन शाह यांच्या पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली. एकूण २७५ जागांपैकी तब्बल १८२ जागा जिंकत त्यांनी नेपाळच्या राजकारणातील जुन्या प्रस्थापितांना धूळ चारली. मधेश भागातून देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पदावर पोहोचणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. गुरुवारी त्यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आणि आज (२७ मार्च) त्यांचा शपथविधी पार पडला. हा विजय म्हणचे 'जेन-झी' (Gen-Z) पिढीच्या क्रांतीचा विजय मानला जात आहे.
कोण आहेत बालेन शाह?
बालेन हे राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (RSP) चे नेते आहेत. काठमांडूचे माजी महापौर राहिलेले बालेन शाह हे व्यवसायाने इंजिनीअर असून रॅप गाण्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ओळखले जातात. सहा महिन्यांपूर्वी भ्रष्टाचाराविरोधात उसळलेल्या जनआंदोलनानंतर त्यांनी तरुणांचे नेतृत्व केले. आता बालेन हे, १५ ते १८ मंत्र्यांचे छोटे मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. नेपाळची अर्थव्यवस्था सुधारणे आणि भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणे हे बालेन सरकार समोरील मोठे आव्हान असेल. नेपाळमधील पारंपरिक घराणेशाही मोडीत काढून एका रॅपरच्या हाती देशाची कमान येणे, हा तेथील राजकारणातील सर्वात मोठा बदल मानला जात आहे.