लेकासाठी खुर्ची सोडणाऱ्या राणीची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:46 PM2024-01-16T12:46:45+5:302024-01-16T12:47:12+5:30

डेन्मार्कची राणी, क्वीन मागार्रेट द्वितीय. 

Queen Margaret II, Queen of Denmark. | लेकासाठी खुर्ची सोडणाऱ्या राणीची गोष्ट!

लेकासाठी खुर्ची सोडणाऱ्या राणीची गोष्ट!

राजा-राणीच्या गोष्टीत हरवून जाण्याचं एक वय असतं असं ढोबळपणे मानलं जात असलं तरी राजा-राणीच्या गोष्टींची, राजघराण्यातल्या कलहांची, भाऊबंदकीची आणि कट-कारस्थानांची गोष्ट सगळ्याच वयाच्या माणसांना आवडते. तशीच ही एका राणीची गोष्ट. दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि जर्मनीने डेन्मार्क ताब्यात घेतलं तेव्हा तिचा जन्म होऊन जेमतेम आठवडाच झाला होता. राजाची सगळ्यात थोरली लेक ती. राजाला वाटलं आपल्या या लेकीच्या नशिबी काय भोग असतील? पण लेकीचं नशीबही बलवत्तर आणि लेक तर त्याहून खमकी निघाली. त्या खमक्या राणीची ही गोष्ट. डेन्मार्कची राणी, क्वीन मागार्रेट द्वितीय. 

वयाच्या ८३ व्या वर्षी मार्गारेट राणीने जाहीर केलं की मी आता पायउतार होणार आणि माझा लेक राजा होणार! डेन्मार्कच्या राजघराण्यात जे गेल्या ९०० वर्षांत झालं नाही ते राणीने करून दाखवलं, जिवंतपणी सत्ता सोडली आणि सगळं मुलाच्या हवाली करून टाकलं. आजारपणाने कंटाळले, पाठीची मोठी शस्त्रक्रिया झाली, काम करवत नाही म्हणून असा निर्णय घेतला असं राणीने सांगितलं खरं; पण त्यावर कुणी विश्वास ठेवेना, यात काही तरी काळंबेरं आहे की काय अशी अनेकांना शंका आहे. ते ही पुढेमागे समोर येईलच पण तुर्त मात्र राणीचा लेक फ्रेडरिक (दहावा) हा राजा झाला. त्याची पत्नी (ऑस्ट्रेलियात जन्मलेली) मेरी ही राणी झाली आणि त्यांचा १८ वर्षांचा मुलगा ख्रिस्टियन राजकुमार झाला. या राजानंतर राजगादीचा तोच वारस असेल असं राणीने जाहीरही करून टाकलं. थोडक्यात काय तर आपल्या पश्चात राजगादी कोण चालवणार याची सगळी घडी बसवून राणीसाहेब तूर्त निवांत झाल्या आहेत. डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी कागदपत्रांची पूर्तता करून सगळं अधिकृत करूनही टाकलं.

वयाच्या ३१ व्या वर्षी मार्गारेट-क्वीन मार्गारेट झाल्या. त्यांचे वडील किंग फ्रेडरिक (नववे) न्यूमोनियाचं निमित्त होऊन गेले. खरं तर डेन्मार्कच्या राजघराण्यात मुलींना राजघराण्याची वारस असण्याची परवानगीच नव्हती. मात्र, आपल्या पश्चात आपली लेकच राणी व्हावी अशी तिच्या वडिलांची इच्छा होती, अर्थात मार्गारेटला भाऊ नव्हता हे एक कारण आणि दुसरं म्हणजे भविष्यात राजेसाहेबांचा भाऊ म्हणजे मार्गारेटचा काका प्रिन्स नड राजा होणार हे जगजाहीर आणि जगमान्यही हाेतं; पण मार्गारेटच्या वडिलांनी सत्ता हातात आल्यावर सात वर्षांतच घटना बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आणि मुलगी राजगादीची वारस ठरू शकते, असा बदल संमत करून घेतला. दरम्यान, लंडनला शिकायला गेलेल्या मार्गारेटचं एका फ्रेंच अधिकाऱ्यावर प्रेम बसलं. त्यांनी लग्न केलं. हेन्री दे लिबार्ड दे मॉनपेझंट हे त्यांचं नाव.  त्यांना दोन मुलं झाली. पहिला फ्रेडरिक (दहावा) आणि दुसरा जोशीन.

राणीचा मोठा मुलगा फ्रेडरिक तसा चर्चेतला!  ‘रिबेल प्रिन्स’ असं त्याचं वर्णन केलं जातं. कुणी कुणी तर त्याला ‘फ्रेडरिक पार्टी’ असंही म्हणत इतका तो पार्ट्यांचा शौकीन. चारचाकी गाड्यांचं त्याला प्रचंड वेड. पुढे पुढे तो राणीच्या हाताखाली तयार झाला किंवा चर्चा अशी की दोन्ही मुलांमध्ये फ्रेडरिकवर राणीचा जास्त जीव आहे. फ्रेडरिकला चार मुलं आहेत आणि जोशीनलाही ४ मुलं आहेत. जोशीनची दोन लग्नं झाली आहेत.
मात्र, २०२२ मध्ये राणीने एकदिवस जाहीर करून टाकलं की ‘जोशीनची चारही मुलं, दोन्ही पत्नी ‘सामान्य माणसांसारखं’ आयुष्य जगू शकतात. त्यांना राजघराण्याच्या नियमातून मुक्त केलं आहे’. त्यावरून गदारोळ झाला. जोशीन आणि त्याच्या कुटुुंबानेही जाहीर नाराजी व्यक्त केली. 

मात्र, राणीने त्यावरचं म्हणणं असं की, ‘त्यांनी नव्या काळात राजघराण्याच्या काटेकोर नियमात कशाला अडकून पडावं? त्यांना नव्या काळातल्या तरुणांसारखं आयुष्य जगता यावं म्हणून मी हा निर्णय घेतला!’ त्यांच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतल्याचं राणीसाहेब सांगत असल्या तरी ते ‘तसं’ नसावं आणि जोशीनसह त्याच्या कुटुंबाला राजसत्तेच्या वारसातून वगळण्याचाच हा डाव असावा, अशी चर्चा त्यावेळी झाली होती; पण या राणीने कुणाला जुमानलं नाही. आता जिवंतपणी राजपदावरून पायउतार करायचा निर्णय घेतला आणि केवळ फ्रेडरिकच नाही तर त्याच्या मुलालाही आपला वारस म्हणून राणीने घोषित करून टाकलं आहे.

खरं-खोटं?- ते राणीच जाणो! 
राणीने जिवंतपणीच सत्ता सोडणं हे वरकरणी साधं दिसत असलं तरी ते प्रत्यक्षात तसं नसावं, एकतर जिवंतपणी सत्ता वर्तमानात कुणालाही सुटत नाही अशी जगभर स्थिती असताना राणी मार्गारेटने असा निर्णय घेण्यामागचा सुप्त हेतू ‘फ्रेडरिकच्या कुटुंबाची सोय लावावी’ असा असावा का, अशी चर्चा आहे? त्यावरून सध्या डेन्मार्कमध्ये चर्चेला ऊत आला आहे. याप्रकरणी खरं-खोटं काय ते राणीच जाणो.
 

Web Title: Queen Margaret II, Queen of Denmark.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.