कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:38 IST2025-10-16T11:37:31+5:302025-10-16T11:38:53+5:30
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला युद्धासारखा तणाव अखेर थंडावला आहे.

कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला युद्धासारखा तणाव अखेर थंडावला आहे. विशेष म्हणजे, कतारने केलेल्या महत्त्वपूर्ण मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी तात्पुरता युद्धविराम जाहीर केला आहे. या युद्धविरामानंतर आता दोन्ही देश शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू करतील. सुमारे २६०० किलोमीटरची सीमा असलेल्या या दोन देशांमध्ये 'डूरंड लाईन' आणि सीमेपलीकडील दहशतवादाच्या मुद्द्यांवरून नेहमीच मतभेद झाले आहेत.
कतारने कशी केली मध्यस्थी?
या युद्धविरामाची घोषणा करताना दोन्ही देशांनी एकमेकांना विनंती केल्याचे म्हटले. अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबिबुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविराम जाहीर करण्यात येत आहे. तर, पाकिस्ताननेही तालिबानच्या विनंतीवरून युद्ध थांबवत असल्याचे स्पष्ट केले.
मात्र, 'बीबीसी उर्दू'च्या अहवालानुसार, युद्धविराम जाहीर होताच कतारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. मुहम्मद अब्दुल अजीज अल-खेलाईफी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांना फोन केला. या फोन कॉलद्वारे कतारने प्रादेशिक शांततेसाठी रचनात्मक भूमिका घेतल्याबद्दल पाकिस्तानची प्रशंसा केली. डार यांनीही शांतता प्रस्थापित करण्यात कतारने बजावलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले. यावरूनच या तात्पुरत्या शांतता करारात कतारने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालिबानचा विश्वासू मित्र आहे कतार
कतारला तालिबानचा जवळचा आणि विश्वासू मित्र मानले जाते. जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानमध्ये तालिबानशी लढत होता, तेव्हापासून तालिबानचे राजकीय कार्यालय कतारमध्ये आहे. २००१ पासून कतारने अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१४ मध्ये कतारच्या पुढाकारानेच 'दोहा करार' झाला होता.
दहशतवादावरून आहे तणाव
पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार दहशतवाद्यांना आश्रय देऊन पाकिस्तानला अस्थिर करत आहे. दोन्ही देशांमध्ये 'डूरंड लाईन' वरूनही तीव्र मतभेद आहेत. पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा करताना, भविष्यातही दहशतवादाविरुद्ध कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे, तर अफगाणिस्तानने पाकिस्तानने पुन्हा हल्ला केल्यास त्याच भाषेत उत्तर देण्याची धमकी दिली आहे. सध्यातरी कतारच्या मध्यस्थीमुळे सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित झाली असून, शांतता चर्चेकडे जगाचे लक्ष लागले आहे.