डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी पुतिन यांना बोलवलं; जाताना २ कोटी रुपयांचे बिल दिलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:38 IST2025-08-21T14:37:20+5:302025-08-21T14:38:42+5:30
अलास्का दौऱ्यावर गेलेल्या व्लादिमीर पुतिन यांना अमेरिकेला रोख स्वरुपात २.२ कोटी रुपये द्यावे लागले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी पुतिन यांना बोलवलं; जाताना २ कोटी रुपयांचे बिल दिलं
Trump Putin Meet: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची १५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये भेट झाली. या भेटीतून दोन्ही देशांना ठोस असं काही हाती लागलं नाही जगभर त्याची चर्चा झाली. व्लादीमीर पुतिन अलास्कामध्ये पोहोचल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मात्र अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे पुतिन यांच्या टीमला विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागली तीसुद्धा रोख स्वरुपात.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जवळजवळ चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात तोडगा काढण्यासाठी अमेरिकेत आल्याने १५ ऑगस्ट ही तारीख ऐतिहासिक होती. तिथे पुतिन यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. पण रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे, त्यांची टीम अमेरिकन बँकिंग प्रणाली वापरून रशियन विमानांमध्ये इंधन भरू शकली नाही. त्यामुळे त्यांना अमेरिकेला २.२ कोटी रुपये रोख स्वरुपात द्यावे लागले.
निर्बंधांमुळे रशिया अमेरिकन बँकिंग प्रणाली वापरू शकत नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले की यामुळेच पुतिन यांना सुमारे २५०,००० डॉलर (सुमारे २.२ कोटी रुपये) रोख द्यावे लागले. 'रशियन विमानांना इंधन भरण्यासाठी अलास्कामध्ये थांबावे लागले. त्यांना रोखीने पैसे द्यावे लागले कारण ते आपल्या बँकिंग प्रणालीद्वारे व्यवहार करू शकत नव्हते. आधीच लागू असलेले सर्व निर्बंध अजूनही लागू आहेत आणि रशिया दररोज त्यांचे परिणाम भोगत आहे,' असे रुबियो म्हणाले.
पुतिन यांची टीम सुमारे पाच तास अलास्कामध्ये होती आणि पत्रकार परिषदेनंतर ते परतले. जवळजवळ तीन तास चाललेल्या या बैठकीनंतरही कोणताही ठोस निर्णय झाला नाही. युद्धबंदी किंवा इतर कोणत्याही कराराची घोषणा झाली नाही. रशियाने युद्ध थांबवण्याच्या बदल्यात युक्रेनकडून डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेशांची मागणी केल्याचे अनेक माध्यमांनी म्हटलं. लुहान्स्कचा मोठा भाग आधीच रशियाच्या ताब्यात आहे. डोनेस्तकचे काही भाग अजूनही युक्रेनकडे आहेत, जिथे क्रामाटोर्स्क आणि स्लोव्हियान्स्क सारखी मोठी शहरे आहेत. या ठिकाणांचे रक्षण करताना युक्रेनला मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागले.
दरम्यान, त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. त्यांच्यासोबत अनेक युरोपीय नेतेही उपस्थित होते. ट्रम्प आणि पुतिन यांनी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली आणि रशिया आणि युक्रेनमध्ये थेट चर्चा होईल असा निर्णय घेतला. 'मी पुतिन यांच्याशी थेट चर्चेसाठी तयार आहेत, पण युक्रेनची जमीन सोडणारा कोणताही प्रस्ताव स्वीकारणार नाही,' असं झेलेन्स्की म्हणाले.