बायडेन सरकारने पुतीन यांच्या हत्येचा कट रचला; अमेरिकन पत्रकाराचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:55 IST2025-01-29T16:55:15+5:302025-01-29T16:55:48+5:30
माजी अमेरिकन पत्रकार टकर कार्लसनने जो बायडेन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

बायडेन सरकारने पुतीन यांच्या हत्येचा कट रचला; अमेरिकन पत्रकाराचा खळबळजनक दावा
Vladimir Putin Joe Biden Govt : अमेरिकेतील एका पत्रकाराने जो बायडन सरकारबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. फॉक्स न्यूजचे माजी अँकर टकर कार्लसनने त्यांच्या "द टकर कार्लसन शो" या पॉडकास्टमध्ये दावा केला की, बायडेन सरकारने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
टकर कार्लसन आपल्या पॉडकास्टमध्ये अमेरिकन लेखक आणि पत्रकार मॅट तैबी यांच्याशी चर्चा करत होते. यावेळी कार्लसन म्हणाले की, 'बायडेन प्रशासनाने पुतिन यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. टोनी ब्लिंकन (अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री) देखील या कटाचा भाग असू शकतात. बायडेन प्रशासन अराजकतेद्वारे आपले उद्दिष्ट लपविण्याचा प्रयत्न करत होते,' असा दावाही टकरने यावेळी केला आहे.
🇺🇸🇷🇺 Tucker Carlson said that the Biden administration tried to kill Vladimir Putin
— Маrina Wolf (@volkova_ma57183) January 28, 2025
The goal is to start World War III and sow chaos. Carlson said this during an interview with journalist Matt Taibbi. pic.twitter.com/k7STerZxFg
या दाव्यामुळे अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे प्रदान केले गेले नाहीत किंवा बायडेन प्रशासन किंवा इतर कोणत्याही अधिकृत स्त्रोताने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, टकर कार्लसनच्या दाव्यानंतर बायडेन प्रशासनाविरोधात नवी चर्चा सुरू झाली आहे. या दाव्याचा जागतिक राजकारणात अमेरिका-रशिया संबंधांवर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्वाचे आहे.
कोण आहे टकर कार्लसनचा ?
टकर कार्लसन हे पुराणमतवादी राजकारणातील एक प्रमुख चेहरा असून, त्यांची अनेक वादग्रस्त विधाने आणि आरोप यापूर्वीही चर्चेत आली आहेत. ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे मानले जातात. फॉक्स न्यूज सोडल्यानंतरही ते वेगवेगळ्या व्यासपीठांवर अमेरिकन राजकारणावर खुलेपणाने त्यांचे मत व्यक्त करत आहेत.
रशियाची प्रतिक्रिया
कार्लसनच्या दाव्यानंतर रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, रशिया व्लादिमीर पुतिन यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. पेस्कोव्ह पुढे म्हणाले की, रशियाच्या विशेष सेवा सतर्क आहेत आणि राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व संभाव्य उपायांची अंमलबजावणी करतात.