रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 20:31 IST2025-12-19T20:29:38+5:302025-12-19T20:31:10+5:30
"आम्ही सुरुवातीपासूनच हा संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी इच्छुक आहोत आणि आजही त्यासाठी तयार आहोत," असे पुतिन यांनी स्पष्ट केले आहे.

रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
मॉस्को: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठे आणि महत्वाचे विधान केले आहे. आपण युक्रेनसोबत सुरू असलेले युद्ध तत्काळ थांबवण्यास तयार आहोत, असे पुतिन यांनी म्हटले आहे. मात्र, यासाठी त्यांनी 'सुरक्षेची खात्री' (Security Guarantee) देण्याची मोठी अट ठेवली आहे. जर रशियाला सुरक्षेची हमी दिली गेली, तर आपण हे युद्ध थांबवण्यास तयार आहोत, असे पुतिन यांनी म्हटले आहे.
आम्ही सुरुवातीपासूनच संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यास इच्छुक -
शांतता चर्चेसंदर्भात बोलताना पुतिन म्हणाले, अद्याप युक्रेनकडून या प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष तयारी दिसून आलेली नाही. तरीही, कीव प्रशासनाकडून काही सकारात्मक संकेत मिळत आहेत, ज्यावरून ते चर्चेत सहभागी होण्यास तयार असल्याचे दिसते. "आम्ही सुरुवातीपासूनच हा संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी इच्छुक आहोत आणि आजही त्यासाठी तयार आहोत," असे पुतिन यांनी स्पष्ट केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक -
यावेळी पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांदरम्यान शांतता घडवून आणण्यासाठी जे प्रयत्न केले, त्यांचाही पुतिन यांनी उल्लेख केला. "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे युद्ध संपवण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न करत होते. एंकरेज भेटीदरम्यान ट्रम्प यांनी मांडलेल्या प्रस्तावांशी आम्ही व्यावहारिकदृष्ट्या सहमती दर्शवली होती. त्यामुळे रशिया शांतता प्रस्तावांना नकार देत आहे, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहे," असेही ट्रम्प म्हणाले.
"आता चेंडू पूर्णपणे आमच्या पाश्चात्य विरोधकांच्या कोर्टात आहे. मुख्यत्वे कीव प्रशासनाच्या. रशिया चर्चेसाठी आणि संघर्षाच्या शांततापूर्ण समाधानासाठी पूर्णपणे सज्ज आहे," असेही पुतिन यांनी म्हटले आहे.