डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 07:40 IST2025-08-07T07:38:50+5:302025-08-07T07:40:18+5:30
Russia-Ukraine News : ट्रम्प यांचे दूत विटकॉफ यांनी पुतिन यांच्याशी भेट घेतली, ज्यामुळे शांततेची काही आशा निर्माण झाली होती. पण..

डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
रशिया-युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक लांबत चाललं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दूत विटकॉफ यांनी पुतिन यांच्याशी भेट घेतली, ज्यामुळे शांततेची काही आशा निर्माण झाली होती. परंतु, आता युक्रेन युद्धाचे पुढे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण रशियाने युद्धविराम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. क्रेमलिनने जाहीर केलं आहे की, 'देशहितासाठी जे योग्य असेल तेच केलं जाईल.' रशियाच्या या भूमिकेमागे चीनचा पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे.
अमेरिका युद्धविरामासाठी प्रयत्नशील, पण रशियाची तयारी वेगळी!
अमेरिकेने मुत्सद्देगिरी आणि लष्करी सामर्थ्य या दोन्हींचा वापर करून पुतिन यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांना रशियासोबत थेट युद्ध करायचं नाही, हे स्पष्ट आहे. म्हणूनच स्टीव्ह विटकॉफ मॉस्कोला पोहोचले होते. त्याचबरोबर ट्रम्प यांनी आपला आणखी एक जवळचा नेता पुतिन यांना समजावण्यासाठी कामाला लावला आहे.
याचदरम्यान, अमेरिकेची नौसेना अलास्काच्या चुक्ची समुद्रात युद्धाभ्यास करत आहे. हे ठिकाण रशिया आणि अमेरिका यांच्यातील सर्वात जवळचं आहे. अमेरिका, यूके आणि डेन्मार्क एकत्र येऊन हा युद्धाभ्यास करत आहेत. अमेरिकेची ही चाल रशियावर दबाव टाकण्यासाठी आहे.
नेतन्याहूंची मध्यस्थी, पण पुतिन शांततेच्या मूडमध्ये नाहीत!
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू हे देखील रशियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या सात दिवसांत त्यांनी पुतिन यांना दोन वेळा फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४० मिनिटं चर्चा झाली. नेतन्याहू यांनी म्हटलं आहे की ते रशिया-अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि युद्धविरामावर सकारात्मक चर्चा झाली आहे. पण जगातील वृत्तसंस्थांच्या मते, पुतिन यांच्या भूमिकेवरून हे स्पष्ट आहे की, युद्धविराम होण्याची शक्यता नाही.
रशियाने अण्वस्त्र करारातून घेतली माघार
क्रेमलिनने सांगितलं आहे की, आता अण्वस्त्र क्षेपणास्त्रे तैनात करण्यावर कोणतीही मर्यादा नाही. रशियाला हवी तेवढी अण्वस्त्र क्षेपणास्त्रे तैनात करू शकतो. हा करार १९८७ मध्ये रशिया आणि अमेरिका यांच्यात झाला होता, ज्यात ५००-५५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या तैनातीवर मर्यादा होती. आता रशिया या करारातून बाहेर पडला आहे.
चीनही रशियाच्या बाजूने युद्धासाठी सज्ज
अमेरिकेच्या विरोधात युद्धाचा मोर्चा तयार झाला आहे, यात रशियाचा खास मित्र चीनही सामील आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेने रशियाला घेरलं आहे, त्याचप्रमाणे रशिया आणि चीनने एकत्र येऊन अमेरिकेचा मित्र देश असलेल्या जपानला घेरलं आहे. रशिया आणि चीनची सेना जपानजवळच्या पूर्व समुद्रात संयुक्त युद्धाभ्यास करत आहेत. जर चर्चा यशस्वी झाली नाही, जर रशियाच्या तेलाची निर्यात करणाऱ्या जहाजांवर हल्ले झाले किंवा रशियाच्या हिताला धक्का लागला, तर कधीही महायुद्ध सुरू होऊ शकतं.