'इम्रान खान, संवादानं समस्या सुटल्या असत्या; तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 03:27 PM2019-02-21T15:27:48+5:302019-02-21T15:31:04+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बोलंदाजीवर राम गोपाल वर्मा यांचा षटकार

pulwama terror attack director ram gopal verma slams pakistan pm imran khan | 'इम्रान खान, संवादानं समस्या सुटल्या असत्या; तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता'

'इम्रान खान, संवादानं समस्या सुटल्या असत्या; तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता'

Next

मुंबई: काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावे मागणारे आणि भारताला धमकी देणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी जबरदस्त टोला लगावला. संवादानं प्रश्न सुटतात, असा सूर लावणाऱ्या खान यांना वर्मा यांनी सणसणीत उत्तर दिलं. संवादानं प्रश्न सुटले असते, तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता, असं ट्विट वर्मा यांनी केलं. विशेष म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये इम्रान खान यांना टॅग केलं आहे. वर्मा यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 




राम गोपाल वर्मा यांनी पाच ट्विट करत इम्रान खान यांना लक्ष्य केलं. 'समोरुन एक जण तुमच्या दिशेनं एक गाडी घेऊन येतो. ती आरडीएक्सनं भरलेली असते. त्या व्यक्तीशी आम्ही संवाद कसा साधायचा, हे खान यांनी शिकवावं. खान यांनी याबद्दल मार्गदर्शन केल्यास, आम्ही भारतीय त्यांना गुरुदक्षिणादेखील देऊ', असं म्हणत वर्मा यांनी खान यांना सणसणीत टोला लगावला. दहशतवादी कारवायांचे पुरावे मागणाऱ्या खान यांना वर्मा यांनी दुसऱ्या ट्विटमधून एक प्रश्नदेखील विचारला. 'प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जर तुमच्या देशात ओसामा आहे, हे अमेरिकेला समजतं. पण तुमच्या स्वत:च्या देशाला कळत नाही. तर तुमचा देश खरंच तुमचा आहे?', असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केला. 







पाकिस्तानातील सक्रीय दहशतवादी संघटनांवरुनदेखील वर्मा यांनी खान यांना खोचक शब्दांमध्ये लक्ष्य केलं. 'प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल-कायदा तुमचे प्ले स्टेशन्स नाहीत, असं मला कोणीच सांगितलं नाही. मात्र तुमचं त्या संघटनांवर प्रेम नाही, असं तुम्ही म्हटल्याचं मी कधीही ऐकलेलं नाही,' असा टोला वर्मा यांनी लगावला. वर्मा यांनी क्रिकेटच्या संज्ञा वापरुनदेखील चौफेर टोलेबाजी केली. 'प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल-कायदा हे तुमच्याच देशातले चेंडू आहेत, असं मी ऐकलं. हे चेंडू तुम्ही सीमेपार टोलवून भारताच्या पॅव्हेलियनमध्ये पाठवता. क्रिकेटचे चेंडू तुम्हाला बॉम्ब वाटतात का सर? कृपया मार्गदर्शन करा,' असं वर्मा यांनी म्हटलं आहे. 





राम गोपाल वर्मा यांच्या सर्व ट्विट्सची सध्या सोशल मीडियात जबरदस्त चर्चा आहे. वर्मा यांनी त्यांच्या सर्व ट्विटमध्ये खान यांना टॅग केलं आहे. त्यामुळे आता या ट्विट्सना खान यांना काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुलवामातील हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर देशात संतापाची लाट आहे. यानंतर भारतानं पाकिस्तानला देण्यात आलेला 'मोस्ट फेव्हर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला आहे. भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा केला आहे. याशिवाय अधिक आर्थितक निर्बंध लादण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. 

Web Title: pulwama terror attack director ram gopal verma slams pakistan pm imran khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.