ट्रम्प विरोधात उसळला जनक्षोभ; ८० लाख नागरिक रस्त्यावर! पदावरून हटवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 06:49 IST2026-03-30T06:48:43+5:302026-03-30T06:49:27+5:30
अमेरिका-युरोपमध्ये ३,३०० ठिकाणी भव्य निदर्शने; लोकशाहीसाठी घोषणाबाजी

ट्रम्प विरोधात उसळला जनक्षोभ; ८० लाख नागरिक रस्त्यावर! पदावरून हटवण्याची मागणी
सेंट पॉल (अमेरिका): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध व इराणशी सुरू असलेल्या युद्धाच्या विरोधात संपूर्ण अमेरिका आणि युरोपमध्ये 'नो किंग्स' रॅलींच्या माध्यमातून जनक्षोभ उसळला आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी आणि लॉस एंजेलिससह अमेरिकेतील लहान-मोठ्या शहरांमध्ये लाखो आंदोलकांनी ट्रम्प प्रशासनाचा निषेध केला. "आम्हाला राजा किंवा हुकूमशहा नको, तर लोकशाही हवी आहे," अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी रस्ते व्यापून टाकले होते. या आंदोलनाचे मुख्य केंद्र मिनेसोटा प्रांत ठरले. हजारो लोक सेंट पॉल येथील कॅपिटल लॉनवर जमा झाले. प्रसिद्ध गायक ब्रूस स्प्रिंगस्टीन यांनी यावेळी 'स्ट्रिट्स ऑफ मिनियापोलिस' हे गाणे सादर करत ट्रम्प यांच्या कठोर इमिग्रेशन धोरणांवर कडाडून टीका केली.
वॉशिंग्टन डीसीमध्ये आंदोलकांनी नॅशनल मॉल आणि लिंकन मेमोरियल परिसर पूर्णपणे व्यापला होता. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्येही १ लाखांहून अधिक लोक जमा झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, लॉस एंजेलिसमध्ये आंदोलक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली, ज्यात काही अधिकाऱ्यांना दुखापत झाली असून पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी 'नॉन-लेथल' शस्त्रांचा वापर केला. व्हाइट हाऊसने मात्र या आंदोलनांची खिल्ली उडवत त्यांना "ट्रम्प डिरेन्जमेंट थेरपी सेशन्स" असे संबोधले आहे.
जागतिक पडसाद
हे आंदोलन केवळ अमेरिकेपुरते मर्यादित न राहता जगातील १२ पेक्षा जास्त देशांत पसरले आहे. युरोप, लंडन, पॅरिस आणि लिस्बनमध्ये अमेरिकन अनिवासी नागरिकांनी निदर्शने केली. इटलीत रोममध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विरोधात आणि इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. ऑस्ट्रेलिया आणि लॅटिन अमेरिका येथेही लोकशाहीच्या समर्थनार्थ 'नो टायरंट्स' या नावाखाली रॅली काढण्यात आल्या.
युद्धावर तोडग्यासाठी इस्लामाबादमध्ये नेत्यांची खलबतं !
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी रविवारी इजिप्त आणि तुर्कीच्या आपल्या समकक्षांशी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय भेट घेतली. सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर या भेटी पार पडल्या. इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलती आणि इशाक दार यांच्यातील चर्चेत द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण सहकार्यावर समाधान व्यक्त करण्यात आले. दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील तणावावर चिंता व्यक्त करत, हा वाद संवाद व मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवण्यावर भर दिला. इशाक दार यांनी गाझा आणि वेस्ट बँकमधील इस्रायली सैन्याच्या कारवाईचा निषेध करत पॅलेस्टिनी जनतेला पाठिंबा दर्शवला, तसेच इजिप्तने गाझामध्ये पोहोचवलेल्या मानवतावादी मदतीचे कौतुक केले. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांच्याशी झालेल्या भेटीत दार यांनी पाकिस्तान आणि तुर्कीमधील ऐतिहासिक संबंधांचा पुनरुच्चार केला.
तीन पत्रकारांचा मृत्यू; लेबनॉनमध्ये जनक्षोभ
दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात ठार झालेल्या तीन पत्रकारांच्या अंत्यविधीसाठी रविवारी चोड़फात येथे मोठी गर्दी जमली होती. 'अल-मणार टीव्ही'चे अली शोईब, 'अल-मायादीन टीव्ही'च्या फातिमा फतौनी आणि कॅमेरामन मोहम्मद हे युद्धाचे कव्हरेज करत असताना त्यांच्या कारवर हल्ला झाला.