ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 09:11 IST2025-12-18T09:10:52+5:302025-12-18T09:11:43+5:30
भारत बांगलादेशात हस्तक्षेप करत आहे असा आरोप हसनात अब्दुल्लाचा आहे. त्यामुळे फुलटोली परिसरात झालेल्या पक्षाच्या बैठकीत हसनातने भारताच्या धोरणांवर टीका केली.

ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
बांगलादेशात सातत्याने भारतविरोधी निदर्शने होत आहेत. बुधवारी ढाका येथे भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या दिशेने मोर्चा नेणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले. या सामाजिक घटकांकडून भारताविरोधात चिथावणी देणाऱ्या घोषणा सुरू होत्या. हे आंदोलनकर्ते भारतीय उच्चायुक्त कार्यालयात तोडफोड करण्याची धमकी देत होते. बांगलादेशात सुरू असलेल्या या प्रकारावर भारताने तीव्र निषेध नोंदवत बांगलादेशातील उच्चायुक्त कार्यालय परिसरातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
त्यातच नॅशनल सिटिजन पार्टीचे मुख्य समन्वयक हसनात अब्दुल्ला भारताविरोधात गरळ ओकत आहे. हसनात अब्दुल्ला याला निवडणूक लढवायची आहे. नॅशनल सिटिजन पार्टीने त्याला पक्षाची उमेदवारी दिली आहे. त्यात निवडणुकीत लोकांच्या भावना भडकवण्यासाठी हसनात सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये करत आहे. बुधवारी एका बैठकीत तो म्हणाला की, जर तुम्ही पाहताच गोळी मारण्याच्या धोरणेवर विश्वास ठेवता तर मी सलाम करण्याचं धोरण का मानू? असा प्रश्न त्याने केला. याच नेत्याने काही दिवसांपूर्वी जर बांगलादेशला अस्थिर केले तर त्याचा परिणाम सर्व क्षेत्रावर पडेल आणि भारताचे सेवन सिस्टर्स वेगळे करू अशी धमकी दिली होती.
भारत बांगलादेशात हस्तक्षेप करत आहे असा आरोप हसनात अब्दुल्लाचा आहे. त्यामुळे फुलटोली परिसरात झालेल्या पक्षाच्या बैठकीत हसनातने भारताच्या धोरणांवर टीका केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अलीकडेच काही मुद्द्यांवर चिंता व्यक्त करत बांगलादेशी उच्चायुक्तांना भेटण्यास बोलवले होते. त्याचवेळी हसनात अब्दुल्लाने ही प्रतिक्रिया दिली. बांगलादेशातील हिंसेशी निगडीत लोकांना भारताने कथितपणे आश्रय दिल्याचा दावा हसनातचा आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना आश्रय देणे, ट्रेनिंग आणि आर्थिक मदत करण्याचा आरोप हसनातने भारतावर केला आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांना आश्रय देणे अन् बांगलादेशात अस्थिरता निर्माण करणाऱ्यांसोबत मैत्रीच्या संबंधाची अपेक्षा करू शकत नाही असं हसनात अब्दुल्लाने म्हटलं आहे. बांगलादेशात निवडणुकीच्या घोषणेनंतर भारताविरोधातील हालचाली वाढल्या आहेत. येत्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगलादेशात निवडणूक होणार आहे. ढाका येथे भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली. मागील वर्षी जुलैमध्ये हिंसा भडकल्यानंतर बांगलादेश सोडणाऱ्या पंतप्रधान शेख हसीना आणि इतरांच्या प्रत्यार्पणाची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. ढाका येथील ही परिस्थिती पाहता भारत सरकारने भारतीय व्हिसा एप्लिकेशन सेंटर बंद केले आहे.