पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 12:28 IST2025-07-20T12:27:50+5:302025-07-20T12:28:21+5:30

शेख हसीना सत्तेवरून पायउतार होण्याच्या काही दिवस आधी अवामी लीगने त्यावर पूर्ण बंदी घातली. नंतर प्राध्यापक मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने ही बंदी उठवली.

Pro-Pakistan Jamaat-e-Islami shows strength in Bangladesh; Signs of Islamic rule in the country? | पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

ढाका - बांगलादेशात इस्लामी राजवट आणण्याचा प्रयत्न सुरू असताना देशातील सर्वात मोठी इस्लामिक पार्टी जमात ए इस्लामीने ढाका येथे महारॅली आयोजित करून त्यांची ताकद दाखवली आहे. पाकिस्तानी समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमात ए इस्लामीने मागील वेळी १९७० च्या निवडणुकीआधी तत्कालीन पूर्व पाकिस्तानच्या पलटन मैदानात महारॅली काढली होती. आता पुन्हा शनिवारी काढलेली महारॅली पक्षाचे अध्यक्ष अमीर शफीकुर्रहमान यांच्याकडून काढण्यात आली. त्यांनी या रॅलीत यापुढच्या काळात हिंसक संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे.

अवामी लीगचा स्पष्ट उल्लेख करत रहमान म्हणाले की, २८ ऑक्टोबर २००६ पासून तत्कालीन निमलष्करी दल बीडीआर बॉर्डर गार्ड फोर्सच्या लष्करी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूसह विविध राजकीयदृष्ट्या प्रेरित हत्याकांडांसाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर आणि जुलै २०२४ च्या घटनांवर बांगलादेशच्या भूमीवर खटला चालवला पाहिजे असं त्यांनी सांगितले. जमात-ए-इस्लामीने बांगलादेश मुक्ती चळवळीला विरोध केला आणि पाकिस्तानी सैन्यासह बांगलादेशींच्या नरसंहारात सहभागी होती. शेख हसीना सत्तेवरून पायउतार होण्याच्या काही दिवस आधी अवामी लीगने त्यावर पूर्ण बंदी घातली. नंतर प्राध्यापक मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने ही बंदी उठवली.

भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलनाची घोषणा

त्याशिवाय पक्ष आता देशात भ्रष्टाचार आणि खंडणीविरुद्ध आंदोलन सुरू करेल असं रॅलीमध्ये रहमान यांनी घोषणा केली. जमात-ए-इस्लामीचे शक्तीप्रदर्शन त्यांना मित्रपक्ष बीएनपीविरुद्ध उभं करू शकते. जर जमात-ए-इस्लामी सत्तेत आली तर पक्षाशी संबंधित कोणताही आमदार किंवा मंत्री सरकारी जमीन आणि करमुक्त वाहने स्वीकारणार नाही किंवा सार्वजनिक पैशाचे वैयक्तिक व्यवस्थापन करणार नाही असा रहमान यांनी दावा केला. 

जमात ए इस्लामीचा प्रमुख अजेंडा काय?

जमात-ए-इस्लामीच्या प्रमुख अजेंड्यांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय निवडणुकांमध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणाली लागू करण्यासाठी प्रचार करणे आहे. सध्याच्या राजकीय संदर्भात प्रमाणशीर प्रतिनिधित्व (पीआर) प्रणाली अंतर्गत निवडणुका ही सर्वात योग्य पद्धत आहे असं पक्षाचे वरिष्ठ नेते नायब अमीर अब्दुल्ला मोहम्मद ताहिर यांनी रॅलीमध्ये सांगितले. जमात-ए-इस्लामीचा सर्वसाधारण निवडणुकांमध्ये खराब रेकॉर्ड आहे कारण बीएनपीसोबत युती असताना पक्ष कधीही चांगल्या जागांवर विजय मिळवू शकला नाही. बीएनपी पीआर प्रणालीला विरोध करते.

दरम्यान, इतर इस्लामी पक्षांचे नेते आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल सिटीझन पार्टी (एनसीपी) यांनीही जमातच्या रॅलीला हजेरी लावली. बीएनपीला रॅलीला आमंत्रित करण्यात आले नव्हते. सुमारे ६ लाख लोक रॅलीला उपस्थित होते आणि संपूर्ण ढाकामध्ये पक्षाचे कार्यकर्ते दिसून आले. रॅलीला संबोधित करताना ६६ वर्षीय जमातचे अमीर रहमान दोनदा बेशुद्ध पडले आणि नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले

Web Title: Pro-Pakistan Jamaat-e-Islami shows strength in Bangladesh; Signs of Islamic rule in the country?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.