राष्ट्रपती पदक विजेता, INS विराटवर बजावले काम; मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले ८ अधिकारी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 13:04 IST2023-10-27T13:00:34+5:302023-10-27T13:04:33+5:30
8 ex-Indian Navy officers: कतारमधील न्यायालयाने आठ माजी भारतीय नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

राष्ट्रपती पदक विजेता, INS विराटवर बजावले काम; मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले ८ अधिकारी कोण?
नवी दिल्ली: कतारमधील न्यायालयाने आठ माजी भारतीय नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ते गेल्या एक वर्षापासून तुरुंगात कैद आहेत. ही शिक्षा अत्यंत धक्कादायक असून, त्यांची सुटका करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधले जात आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
आठ भारतीयांवर नेमके काय आरोप आहेत, हे कतार सरकारने सार्वजनिक केलेले नाहीत. मात्र भारतीय नौदलाचे माजी अधिकारी इस्रायलसाठी त्यांच्या देशाची हेरगिरी करत असल्याचा दावा कतारच्या स्थानिक माध्यमांनी केला आहे. मात्र, यात किती तथ्य आहे हे अद्याप समोर आले नाही. कतारमधील न्यायालयाने आठ माजी भारतीय नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या अधिकाऱ्यांची भारतीय नौदलात असताना उत्कृष्ट सेवा राहिली आहे.
एका अधिकाऱ्याला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उच्च व्यावसायिक कार्यक्षमता, वेगवान काम आणि कुशाग्र मन यामुळे यापैकी एका अधिकाऱ्याला भारतीय लष्करातील सेवेदरम्यान राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने त्यांच्या सेवेदरम्यान तामिळनाडूमधील प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन येथे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. आणखी एका अधिकाऱ्याने त्यांच्या सेवेदरम्यान भारतीय युद्धनौका INS विराटवर फायटर कंट्रोलर आणि नेव्हिगेटिंग ऑफिसर म्हणून काम बजावल्याची माहिती समोर आली आहे. तर काही अधिकारी ऑपरेशनल कमांडर देखील राहिले आहेत.
कतारमध्ये कसे पोहचले?
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांनी २० वर्षे नौदलात काम केले असून महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. या अधिकाऱ्यांनी नौदलात निर्धारित वेळेत सेवा दिल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि चांगल्या संधींच्या शोधात नौदलाची सेवा सोडली. यानंतर हे अधिकारी कतारची खासगी सुरक्षा कंपनी अल दाहरासोबत काम करू लागले.
भारत सरकारचे म्हणणे काय?
कतारच्या कनिष्ठ कोर्टाने अल दाहरा कंपनीच्या आठ भारतीय कर्मचाऱ्यांशी संबंधित खटल्यात आपला हा निर्णय दिला आहे. आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहोत, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
सरकारला नव्हती अटकेची माहिती
कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा ब्युरोने ३० ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना अटक केली. मात्र, सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला अटकेची माहिती देण्यात आली होती. ३० सप्टेंबर रोजी त्यांना आपल्या कुटुंबांसोबत काही वेळ फोनवर बोलण्याची परवानगी दिली नव्हती.