शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा; भारतासह ११ देशांमध्ये माजली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:38 IST2025-01-21T12:37:26+5:302025-01-21T12:38:38+5:30
मागील डिसेंबर महिन्यात ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला होता परंतु त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली होती.

शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा; भारतासह ११ देशांमध्ये माजली खळबळ
Donald Trump Threatens BRICS - डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथग्रहण केल्यानंतर ते अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ट्रम्प यांनी कारभाराची सूत्रे हाती घेताच जगात येत्या काळात अमेरिकेची भूमिका काय असेल याची झलक दाखवली आहे. सत्तेत आल्यानंतर ट्रम्प यांनी कॅनडा आणि मॅक्सिकोवर टॅरिफची घोषणा केली आहे. १ फेब्रुवारीपासून कॅनडा आणि मॅक्सिको यांच्यावर अमेरिकेकडून २५ टक्के टॅरिफ लावला जाईल. त्याशिवाय ट्रम्प यांच्या एका आदेशानं ११ देशांमध्ये खळबळ माजली आहे. त्यात भारत आणि चीन यांचाही समावेश आहे.
BRICS देशांना डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स(BRICS) देशांना उघडपणे धमकी दिली आहे. सोमवारी शपथ घेताच ट्रम्प यांनी म्हटलं की, स्पेनसह ब्रिक्स देशांवर १०० टक्के टॅरिफ लावलं जाऊ शकते. ब्रिक्समध्ये सध्या १० देशांचा समावेश आहे. ज्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, मिस्त्र, इथियोपिया, ईराण आणि संयुक्त अरब अमीरात यांचा समावेश आहे. स्पेन ब्रिक्सचा भाग नाही तरीही स्पेन डोनाल्ड ट्रम्प यांच्या रडारवर आहे. मागील डिसेंबर महिन्यात ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला होता परंतु त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली होती.
काय म्हणाले होते ट्रम्प?
ब्रिक्स देश अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून नवीन चलन आणतील आणि आम्ही शांतपणे पाहत राहू, असं समजू नका. ब्रिक्स देश कोणतंही नवीन चलन आणणार नाही किंवा अमेरिकन डॉलरला पर्याय वापरणार नाही, असे वचन आम्हाला हवं आहे. जर ब्रिक्सने असं केलं नाही तर १००% शुल्काचा सामना करावा लागेल. शिवाय अमेरिकन बाजारपेठेत त्यांचा माल विकण्याचे स्वप्न सोडून द्यावं लागेल असं ट्रम्प म्हणाले होते. जर ट्रम्प यांनी दिलेली धमकी प्रत्यक्षात आली तर ब्रिक्स देशांसमोर मोठी अडचण निर्माण होईल. त्यात ट्रम्प यांच्या धमकीचा भारतावरही परिणाम पाहायला मिळू शकतो.
भारताची भूमिका काय?
मागील काही वर्षांपासून ब्रिक्स संघटनेतील रशिया आणि चीन हे दोन देश अमेरिकेच्या डॉलरला पर्याय शोधत आहेत. ब्रिक्स देशांचे चलन सुरू करण्याच्या विचारात आहेत. भारत मात्र या प्रयत्नांपासून दूर आहे. दक्षिण आफ्रिकेत २०२३ मध्ये झालेल्या ब्रिक्सच्या शिखर परिषदेत अनेक देशांनी नव्या चलनाची व्यवहार्यता तपासण्याबाबत आग्रह धरला होता. ब्राझिलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लूला डिसिल्व्हा यांनी याबाबत एक प्रस्तावही मांडला होता.