चार वर्षांत कोरोनासारखी मोठी साथ येण्याची शक्यता; मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी सर्वांना केले सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 10:58 IST2025-01-28T10:57:12+5:302025-01-28T10:58:09+5:30

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक सुविधांच्या कमतरतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  

Possibility of a major pandemic like Corona in four years says bill gates | चार वर्षांत कोरोनासारखी मोठी साथ येण्याची शक्यता; मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी सर्वांना केले सतर्क

चार वर्षांत कोरोनासारखी मोठी साथ येण्याची शक्यता; मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी सर्वांना केले सतर्क

वाॅशिंंग्टन : पुढील चार वर्षांत जगभरात कोरोनासारखी आणखी एखादी मोठी साथ येण्याची १० ते १५ टक्के शक्यता आहे, असा दावा मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केला. एका अमेरिकी वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

ते म्हणाले की, संकटांना तोंड देण्यासाठी अधिक पूर्वतयारी केली पाहिजे. पण, लोकांनी तशी तयारी केलेली दिसत नाही. कोरोनासारखी भीषण साथ भविष्यात पसरली, तर तिला रोखण्यास जग सज्ज नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक सुविधांच्या कमतरतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  

आरोग्य धोरण कसे असावे?
बिल गेट्स यांनी २०२२मध्ये आगामी काळातील साथ कशी रोखावी या विषयावर एक पुस्तक लिहिले.
साथी, तसेच विविध आजारांना रोखण्यासाठी कशा प्रकारचे जागतिक आरोग्य धोरण असावे याविषयीची आपली मते गेट्स यांनी मांडली.

२०१५ मधील भाकीत खरे ठरले
जगात पसरणाऱ्या साथी व त्यापासून मानवी जीवनाला असलेला धोका, याबाबत बिल गेट्स अनेक वर्षांपासून लोकजागृती करत आहेत. २०१५ साली टेड टॉक या कार्यक्रमात गेट्स यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, प्राणघातक साथीचा मुकाबला करण्यासाठी जगाने कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही.
त्यांनी व्यक्त केलेली ही भीती कोरोनाच्या साथीमध्ये खरी ठरली. नोव्हेंबर २०१९मध्ये सुरू झालेली कोरोनाची साथ काही महिन्यांत जगभरात पसरली. आतापर्यंत कोरोनामुळे ७ लाख १० हजार लोकांचा मृत्यू झाला.
कोरोनासारखी एखादी प्राणघातक साथ पुन्हा पसरली, तर तिला रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना सध्यातरी कोणत्याही देशाकडे दिसत नाही. ही वस्तुस्थिती गेट्स यांच्यासारख्या दूरदर्शी व्यक्तीला दिसत असल्याने ते यासंदर्भात सर्वांना सतर्क करण्याचे काम करत आहेत. 

पूर्वीच्याच चुकांची होते पुनरावृत्ती, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी अमेरिकी वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जागतिक सहकार्य व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे साथींवर नियंत्रण मिळविणे कठीण जाते.
आपल्याकडे कोणत्या साधनांची कमतरता आहे याबद्दल जगातील सर्व देशांनी एकमताने निर्णय घेतला व त्या साधनांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले तर अनेक अडचणी दूर करता येतील.
मात्र तसे न होता पूर्वी केलेल्या चुकांची अनेक देश पुनरावृत्ती करत आहेत असे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी सांगितले. 

Web Title: Possibility of a major pandemic like Corona in four years says bill gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.