तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 05:30 IST2025-10-23T05:26:57+5:302025-10-23T05:30:39+5:30
पाच दिवसांत ट्रम्प यांनी तेल खरेदीचा मुद्दा तीनदा उपस्थित केला.

तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
वॉशिंग्टन :रशियाकडूनभारत कच्च्या तेलाची खरेदी कमी करण्यास सहमत झाला असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने केला आहे. रशियाकडून जास्त तेल खरेदी करणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला मंगळवारी फोनवरून दिले आहे. कारण त्यांनाही रशिया- युक्रेनचे युद्ध संपलेले पाहायचे आहे, असे ट्रम्प म्हणाले.
मोदींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्पचा फोन आणि दिवाळीनिमित्त दिलेल्या उत्स्फूर्त शुभेच्छांची माहिती दिली. मात्र, रशियन तेलावर भाष्य केले नाही. दरम्यान काँग्रेसने दोन नेत्यांच्या संभाषणावरून सरकारला घेरण्याची तयारी केली असून, सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यातही अशीच टिप्पणी केली होती, परंतु नेत्यांमधील कोणत्याही फोन कॉलची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया त्यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यांवर कोणतीही नवीन टिप्पणी नाही, असे बुधवारी, मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने बीबीसीला प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.
मोदींना रशिया-युक्रेनमधील युद्ध संपलेले पाहायचे आहे आणि तुम्हाला माहिती आहेच की, ते जास्त तेल खरेदी करणार नाहीत. म्हणून त्यांनी त्यात खूप कपात केली आहे आणि ते अजूनही खूप कपात करत आहेत. २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चात्य राष्ट्रांनी खरेदी टाळल्याने आणि मॉस्कोवर निर्बंध लादल्याने भारत रशियन तेलाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक बनला. भारताने आपली आयात वाढवली आणि सवलतीच्या दरात रशियन कच्चे तेल खरेदी करणे सुरूच ठेवले. आमच्या लाखो लोकांना ऊर्जा सुरक्षा प्रदान करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे, असा भारताचा युक्तिवाद आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चात्य राष्ट्रांचे रशियाशी व्यापारी संबंध अजूनही आहेत, हेही भारताने निदर्शनास आणून दिले.
काँग्रेसची घेरण्याची तयारी...
पाच दिवसांत ट्रम्प यांनी तेल खरेदीचा मुद्दा तीनदा उपस्थित केला. दोन नेत्यांमध्ये फोनवर कोणतेही संभाषण झाले नाही, असा दावा करीत विदेश मंत्रालयाने या मुद्याला बगल दिली आहे. ट्रम्प यांनी हा मुद्दा लावून धरला असून, या आठवड्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांची बुडापेस्ट येथे भेट घेण्याच्या तयारीत असताना ते भारतावरील दबाव आणखी वाढवत राहणार आहे.
मोदी हे चांगले मित्र असून, त्यांनी रशियाकडून होणारी आयात थांबविण्याचे आश्वासन दिले आहे, असे ट्रम्प म्हणतात. विदेश मंत्रालय मात्र या संभाषणाबद्दल अनभिज्ञ आहे. भारत नकार देत असला तरी ट्रम्प त्याला थारा देत नाही, असे रमेश त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
मी पंतप्रधान मोदींशी बोललो, आमचे खूप चांगले संबंध आहेत आणि ते रशियाकडून जास्त तेल खरेदी करणार नाहीत, असे ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाइट हाऊस दिवाळी उत्सवादरम्यान पत्रकारांना सांगितले.