न्यूझीलंडच्या राजकारणात खळबळ; पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न देणार राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 09:58 IST2023-01-20T09:57:42+5:302023-01-20T09:58:08+5:30
७ फेब्रुवारीच्या आत पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याची केली घोषणा

न्यूझीलंडच्या राजकारणात खळबळ; पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न देणार राजीनामा
वेलिंग्टन: पुरोगामी नेत्या अशी ओळख असलेल्या न्यूझीलंडच्या महिला पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न (४२) यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मला जितके शक्य होते तितके उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला; पण आता मी पंतप्रधानपदी राहू इच्छित नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे न्यूझीलंडमधील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
जेसिंडा आर्डर्न यांनी लेबर पक्षाच्या बैठकीत सांगितले की, येत्या ७ फेब्रुवारीच्या आत मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहे. त्यांनी म्हटले आहे की, मीही अखेर माणूसच आहे. खूप प्रयत्न करूनही मनासारखे काम होत नसेल तर आपण कुठेतरी थांबायला हवे. त्यानुसारच मी पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांच्या लेबर पक्षाने मोठा विजय मिळवला व त्या सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या होत्या. कोरोना साथीचा कठीण काळ, वाढती महागाई यामुळे न्यूझीलंड त्रस्त झाला असून, याचा फटका त्यांच्या लेबर पक्षाला बसला आहे. (वृत्तसंस्था)