US Police Shot Dead Sikh Man: अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शीख समुदायातील एका तरुणाला पोलिसांनी गोळ्या घातल्या. रस्त्याच्या मधोमध तो तलवार फिरवून गोंधळ घालत होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन त्या तरुणावर गोळीबार केलं. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या शीख समुदायाचा दावा आहे की तो गतका खेळत होता. गतका ही एक पारंपारिक शीख मार्शल आर्ट आणि युद्ध कला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संपात व्यक्त केला.
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये ३५ वर्षीय शीख गुरप्रीत सिंग याला पोलिसांनी गोळ्या घातल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पारंपारिक शीख मार्शल आर्ट गतकाचा सराव करताना दिसत आहे. गोळीबाराची घटना पोलिसांच्या बॉडी कॅमेऱ्यात कैद झाली. लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम अरेनाजवळ गुरप्रीत सिंग तलवार घेऊन फिरत होता. त्याला थांबवण्यात आले तेव्हा त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याला गोळी लागली, असं पोलिसांनी सांगितले.
हा सगळा प्रकार १३ जुलै रोजी घडला असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. व्हिडिओमध्ये गुरप्रीत सिंग २ फूटांचे धारदार शस्त्र हातात धरुन फिरवताना दिसत होता, जे नंतर खंडा असल्याचे समोर आले. ही भारतीय मार्शल आर्ट्समध्ये वापरली जाणारी दुधारी तलवार आहे. रस्त्याच्या मधोमध एक माणूस चाकू घेऊन फिरत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गुरप्रीत सिंगने चौकाच्या मध्यभागी आपली कार थांबवली होती, तो बाहेर पडला आणि लोकांना तलवार दाखवू लागला. एका व्हिडिओमध्ये गुरप्रीत आपली जीभ कापताना दिसत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सिंगला अनेक वेळा शस्त्र खाली ठेवण्यास सांगितले. पण त्याने ऐकले नाही. त्यानंतर तो गाडीकडे परतला, पाण्याची बाटली काढली आणि अधिकाऱ्यांवर फेकली. गुरप्रीत नंतर त्याच्या गाडीत बसला आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या खिडकीतून तलवार हलवत पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. गुरप्रीतने वेगाने गाडी चालवत एका अधिकाऱ्याच्या गाडीला धडक दिली. गुरप्रीत १२ स्ट्रीटजवळ थांबला आणि चाकू घेऊन त्यांच्यावर धावून आला. यादरम्यान पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. सिंगला गोळी लागली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला.