फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:31 IST2025-10-22T16:29:39+5:302025-10-22T16:31:37+5:30
कोर्टाने चोक्सीने केलेले अपहरण आणि राजकीय छळाचे आरोप देखील फेटाळून लावले.

फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
PNB Bank Fraud फरार हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्याचा मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात परत आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बेल्जियमच्या न्यायालयाने त्याच्या प्रत्यर्पणास मंजुरी दिली आहे.
बेल्जियम न्यायालयाचा निर्णय
न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, चोक्सीच्या प्रत्यर्पण प्रक्रियेत कुठलाही कायदेशीर अडथळा नाही. तो बेल्जियमचा नागरिक नाही, तर एक परदेशी नागरिक आहे. त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत, त्यामुळे त्याला भारताकडे सुपूर्द करणे योग्य आहे. कोर्टाने चोक्सीने केलेले अपहरण आणि राजकीय छळाचे आरोप देखील फेटाळून लावले.
चोक्सीवर असलेले आरोप
मेहुल चोक्सी हा PNB घोटाळ्याचा (₹13,500 कोटी) मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या 120B (गुन्हेगारी कट), 201 (पुरावे नष्ट करणे), 409 (विश्वासघात), 420 (फसवणूक), आणि 477A (लेखांकनात फसवणूक), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या (Prevention of Corruption Act) कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांना बेल्जियमच्या कायद्यानुसारही गुन्हेगारी स्वरूप आहे, त्यामुळे न्यायालयाने भारताच्या मागणीस मान्यता दिली.
चोक्सीचे दावे फेटाळले
चोक्सीने न्यायालयात असा दावा केला होता की, त्याचे अँटिग्वामधून अपहरण करून बेल्जियमला आणले गेले आणि भारतात त्याला राजकीय छळाचा धोका आहे. मात्र न्यायालयाने म्हटले की, या दाव्यांचा कोणताही पुरावा नाही. भारत सरकारने न्यायालयाला माहिती दिली की, चोक्सीला मुंबईतील आर्थर रोड जेलच्या बॅरक क्रमांक 12 मध्ये ठेवले जाईल आणि त्याला केवळ वैद्यकीय कारणांसाठी किंवा न्यायालयीन हजेरीसाठीच बाहेर नेले जाईल.